देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती अजुनही पुर्वपदावर आलेली नाही. पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली या राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. यामुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामाची स्पर्धा होणं अधिक कठीण होऊन बसलं आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही सध्याची परिस्थिती कोणतीही स्पर्धा खेळवण्यासाठी योग्य नाही असं म्हटलं होतं. मात्र यंदाचं आयपीएल न झाल्यास धोनीला भारतीय संघात पुनरागमन करणं कठीण होईल असं मत माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे.

“यंदाच्या हंगामातली आयपीएल स्पर्धा झाली नाही तर धोनीला पुनरागमन करणं कठीण होईल. गेलं वर्षभर धोनी क्रिकेट खेळत नाहीये, त्यामुळे कुठल्या निकषावर त्याची संघात निवड करायची हा प्रश्नच आहे.” गौतम गंभीर स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता. याआधी भारताचे माजी खेळाडू कृष्णमचारी श्रीकांत यांनीही आयपीएल रद्द झाल्यास धोनीची संघात निवड होणं कठीण असल्याचं म्हटलं होतं.

२०१९ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचं आव्हान संपुष्टात आलं. संपूर्ण स्पर्धेत धोनीची संथ खेळी हा चर्चेचा विषय होता. यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देत ऋषभ पंतला संधी दिली. ऋषभ पंतला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. मध्यंतरीच्या काळात धोनीला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळावं अशी मागणी सोशल मीडियामधून होत होती…पण भारतीय संघ व्यवस्थापनाने पंतवरच आपला विश्वास दाखवला. मध्यंतरी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी-२० विश्वचषकात धोनीला स्थान मिळवण्यासाठी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणं महत्वाचं असल्याचं म्हटलं होतं.