विम्बल्डन विजेत्या अँडी मरेची भावना

‘‘नोव्हाक जोकोव्हिच अंतिम फेरीत खेळणार नसल्याने दडपण वाढले होते. कारण त्याच्या अनुपस्थितीमुळे एक संधी निर्माण झाली होती. त्या संधीचे सोने करणे माझ्या हातात होते. दडपणाच्या क्षणी अनुभव कामी आला. या प्रदर्शनात सातत्य राखत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेण्यासाठी उत्सुक आहे. मात्र ते फारच अवघड आहे. जोकोव्हिचने कामगिरीत अविश्वसनीय सातत्य जपले आहे. गेले काही महिने मला चांगला सूर गवसला आहे. वर्षअखेपर्यंत असाच खेळलो तर क्रमवारीतील अव्वल स्थान पक्के होऊ शकते,’’ अशी भावना विम्बल्डन विजेत्या अँडी मरेने व्यक्त केली.

‘‘कामगिरीत सातत्य राखण्यासाठी आणखी परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. शारीरिकदृष्टय़ा हे अतिशय खडतर आहे. मात्र त्याला पर्याय नाही. सराव मला आवडतो. व्यायामशाळेत जाणेही मला आवडते. शारीरिकदृष्टय़ा मॅरेथॉन लढतींसाठी सज्ज होण्यासाठी प्रयत्नशील आहे. कॅमेऱ्याच्या लखलखाटासमोर मी अवघडून जातो. तेव्हा दडपण जाणवते. कॅमेरा सोडून बाकी गोष्टी आनंददायी आहेत. जिंकल्यानंतर प्रशिक्षक इव्हान लेंडल यांच्या चेहऱ्यावरील स्मित पुरेसे बोलके होते.

सातत्याने प्रवास करणे, नवीन देश, नवीन संस्कृती अनुभवणे सुखावणारे असते. अपयशाला प्रत्येक क्रीडापटूला सामोरे जावे लागते. त्यामुळे यश मिळाल्यानंतरचा दुर्मीळ क्षण मला समरसून जगायचा आहे’’, असे मरेने सांगितले.