महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडावे, ही मागणी भारताने सलग दोन कसोटी सामने गमावल्यानंतर अधिक तीव्रपणे होऊ लागली आहे. निवड समितीचे माजी सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी तर धोनीच्या भारतीय संघातील स्थानाविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याचप्रमाणे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील आठ कसोटी सामन्यांत पराभव पत्करल्यानंतरही काही अंतर्गत कारणास्तव धोनीची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली नाही, असे अमरनाथ यांनी सांगितले.
‘‘धोनीला कर्णधारपदावरून हलविण्यासाठी मोठी चर्चा होत आहे, क्रिकेटरसिकांनाही ते मान्य आहे. परंतु काही अंतर्गत कारणांमुळे ते घडू शकलेले नाही. मी ते कारण स्पष्ट करणार नाही. परंतु जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा मी देशातील नागरिकांसमोर ते कारण समोर आणीन, ’’ असे अमरनाथ यांनी सांगितले.‘‘मला संघात राहून या आव्हानांना सामोरे जायचे आहे, हे सांगणारा धोनी कोण? त्याने असे काय केले आहे?’’ असे सवाल १९८३च्या भारताच्या जेतेपदाचे नायक अमरनाथ यांनी विचारले.