आतापर्यंत भारतीय क्रिकेटमधील गुणी खेळाडूंची फॅक्टरी अशी बिरुदावली मिळालेल्या मुंबई क्रिकेटची सध्याची अवस्था चिंताजनक असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ‘एक्सलन्स इन क्रिकेट’ या उपक्रमाचे सदिच्छा दूत असलेल्या कार्यक्रमात वेंगसरकर बोलत होते.
‘‘मुंबईतील मैदानांवर कारकिर्दीचा श्रीगणेशा करणाऱ्या वेंगसरकर यांनी मुंबई क्रिकेटला अत्याधुनिक प्रशिक्षणाची गरज आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या माध्यमातून प्रशिक्षकांची फौज निर्माण होते आहे. मात्र ते खेळाडूंचा अचूक मार्गदर्शन करू शकतात का याविषयी साशंकता आहे,’’ असे वेंगसरकर यांनी सांगितले.
‘‘गेल्या २ ते ४ वर्षांत मुंबई क्रिकेटची मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली आहे. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने सलग सोळाव्यांदा रणजी जेतेपद पटकावले. ते दिवस परततील अशी आशा आहे,’’ असे वेंगसरकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘बिशनसिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना यांसारखे खेळाडू चांगले मार्गदर्शन करू शकतात. कॉपोर्रेट लीगच्या संरचनेत बदल व्हावेत.’’