पावसामुळे पहिल्या दोन दिवसांचा खेळ वाया गेल्यानंतर श्रीलंकेने सामन्यात भारताला बॅकफूटवर ढकलून पहिल्या डावात १२२ धावांची आघाडी घेतली. भारताच्या १७२ या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाने पहिल्या डावात २९४ धावा केल्या. मात्र, सलग चौथ्या दिवशी श्रीलंकेच्या खेळाडूचं मैदानातलं वर्तन हे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. श्रीलंकेच्या पहिल्या डावात ५७ व्या षटकात मोहम्मद शामीच्या गोलंदाजीवर दिलरुवान पेरेरा पायचीत असल्याचं अपील पंच नायजेल लाँग यांची उचलून धरलं.

सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये पेरेराने पंचांचा निर्णय मान्य करत, माघारी परतण्याचा निर्णय घेतला. यासाठी तो ड्रेसिंग रुमच्या दिशेने वळलाही. मात्र, क्षणार्धात पेरेराने परत मागे फिरत पंचांच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याचं ठरवलं. डीआरएसमध्ये चेंडू यष्ट्यांना लागत नसल्याचं दिसून येतं होतं. यानंतर तिसऱ्या पंचांनी नायजेल लाँग यांचा निर्णय रद्द ठरवत पेरेरा नाबाद असल्याचा निर्णय दिला. यावेळी श्रीलंकेच्या खात्यात अवघा एक रिव्ह्यू शिल्लक राहिलेला असताना, मोक्याच्या क्षणी रिव्ह्यू घेणं हा धाडसी निर्णय ठरला. मात्र यावेळी टेलिव्हीजन रिव्ह्यूमध्ये श्रीलंकन ड्रेसिंग रुममधून, सपोर्ट स्टाफमधली एक कर्मचारी पेरेराला रिव्ह्यू घेण्यास सांगत असल्याचं अंधुकसं दिसत होतं. नेमकं काय घडलं होतं यावेळी तुम्हीच पाहा…

 

पंचांचा निर्णय मान्य करत पेरेराचा माघारी परतण्याचा निर्णय

 

ड्रेसिंग रुममधून पेरेराला रिव्ह्यू घेण्यासाठी इशारा दिल्याचा संशय

 

पेरेराचा रिव्ह्यू घेण्याचा निर्णय

अवश्य वाचा – चंडीमलच्या कृतीकडे पंचांचा कानाडोळा, ५ धावा न दिल्याने विराट कोहली नाराज

दिलरुवान पेरेराच्या या प्रकारावरुन समालोचक सायमन डुल यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आयसीसीच्या नियमांप्रमाणे डीआरएससाठी खेळाडूने ड्रेसिंग रुममधली व्यक्तींची मदत घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना बाद ठरवलं जातं. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात, कर्णधार स्टिव्ह स्मिथनेही डीआरएसच्या निर्णयासाठी ड्रेसिंग रुममधून मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यावेळी विराट कोहली आणि पंच नायजेल लाँग यांना हा प्रकार लक्षात आला होता. यानंतर पंचांनी स्मिथला मैदान सोडून जाण्यास सांगितलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय संघातील एकाही खेळाडूला ही बाब लक्षात आली नाही. याचसोबत ड्रेसिंग रुममधून नेमक्या कोणत्या व्यक्तीने इशारा केला होता हे समजू शकलेलं नाहीये. त्यामुळे सामनाधिकारी या घटनेवर काय निर्णय घेतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.