श्रीलंकेच्या दिम्यूत करुणारत्नेचा दावा

भारतीय मैदानावर भारतीय फिरकीचे वर्चस्व असते; परंतु रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीला कसे यशस्वी सामोरे जायचे, हा गृहपाठ आम्ही केला आहे, असे श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज दिम्यूत करुणारत्नेने सांगितले.

तो म्हणाला, ‘‘अश्विन व जडेजा हे दोघेही सतत बळी घेण्यासाठी भुकेलेले असतात. खेळपट्टीवर टिच्चून फलंदाजी केल्यास त्यांना यश मिळणार नाही, असेच मी डावपेच करणार आहे. पहिल्या पाच षटकांत कोणतेही धोके पत्करणार नाही. मी स्विपचे फटके नेहमी मारतो. याबाबत भारतात मला काळजी घ्यावी लागणार आहे, याची मला कल्पना आहे. अर्थात सोप्या चेंडूंना सीमापार करण्याची कोणतीही संधी दवडणार नाही.’’

करुणारत्नेने नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १९६ धावा करीत कारकीर्दीतील सर्वोच्च धावसंख्या रचली होती. सप्टेंबरमध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत लंकेकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान करुणारत्नेने मिळवला होता. यात पहिल्या कसोटीत केलेल्या १४१ धावांचा समावेश होता. या मालिकेत दोन वेळा अश्विनच्या गोलंदाजीवर तर एकदा जडेजाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला होता. भारत व श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेला १६ नोव्हेंबर रोजी प्रारंभ होत आहे.