केरळविरुद्ध आत्मविश्वास उंचावणारा विजय मिळवत रणजी करंडक क्रिकेट हंगामाचा शानदार प्रारंभ करणाऱ्या बंगालच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशविरुद्ध बुधवारपासून सुरू झालेल्या लढतीच्या पूर्वसंध्येला प्रशिक्षकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी वेगवान गोलंदाज अशोक दिंडावर शिस्तभंगाची कारवाई करून हकालपट्टी करण्यात आली आहे.

मंगळवारी सराव सत्रादरम्यान गोलंदाजीचे प्रशिक्षक रणदेब बोस आणि कर्णधार अभिमन्यू ईश्वरन यांची चर्चा सुरू होती; परंतु या वेळी सर्वच खेळाडूंच्या उपस्थितीत दिंडाने बोस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आणि मर्यादांचे उल्लंघन केले. बंगाल क्रिकेट संघटनेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गैरवर्तनाप्रकरणी दिंडाला लिखित माफी मागण्यासाठी सायंकाळपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु त्याने दिलगिरी प्रकट करण्यास नकार दिल्यामुळे संपूर्ण उर्वरित हंगामासाठी त्याला संघातून वगळण्यात आले. निवड समितीने त्याच्यावर ही कारवाई केली आहे.

अनुभवी गोलंदाज दिंडाला विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत ५.५२ धावांच्या सरासरीने फक्त १० बळी मिळाले होते. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी त्याला बंगालच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्या वेळी दिंडाने बंगालकडून यापुढे न खेळण्याची धमकी दिली होती. ३५ वर्षीय दिंडाने भारताचे प्रतिनिधित्व करताना १३ एकदिवसीय सामन्यांत १२ बळी आणि ९ ट्वेन्टी-२० सामन्यांत १७ बळी मिळवले आहेत.

दिंडा संघात नसणे, ही दुर्दैवी घटना आहे; परंतु बंगाल क्रिकेट संघटनेचा हा निर्णय आहे. बंगाल क्रिकेटसाठी ही नकारात्मक घटना मुळीच नाही. नव्या गुणवत्तेला शोधण्याची ही उत्तम संधी आहे. एखादा युवा खेळाडू उदयास येईल आणि पाच बळी घेऊन संघातील स्थान बळकट करेल.

– अरुण लाल, बंगालचे मुख्य प्रशिक्षक