बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात षटकांची गती अत्यंत कमी राखल्याबद्दल श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलला निदाहास चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पुढील दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
निर्धारित वेळेत श्रीलंकेच्या संघाने चार षटके कमी टाकल्याबद्दल आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी चंडिमलवर कारवाई करताना निलंबन आणि दंडसुद्धा ठोठावला आहे. बांगलादेशचा कर्णधार महमदुल्लावर सामन्याच्या मानधनाच्या २० टक्के आणि अन्य खेळाडूंना १० टक्के दंड ठोठावला आहे.
आयसीसीच्या खेळाडूंच्या आचारसंहितेसंदर्भातील षटकांची गती कमी राखल्याबद्दलच्या कलम २.५.२चा भंग झाला असल्यामुळे सर्व खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून ६० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. चंडिमलच्या खात्यावर दोन निलंबनाचे गुण जमा झाले. याचाच अर्थ एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये खेळण्यास त्याला बंदी असते. श्रीलंकेचा संघ १२ मार्चला भारताशी आणि १६ मार्चला बांगलादेशशी खेळणार आहे. परंतु या सामन्यांमध्ये चंडिमलला खेळता येणार नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 12, 2018 5:36 am