पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत ब संघाने प्रो. देवधर चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. रांचीच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारत ब संघाने भारत क संघावर ५१ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारत क संघाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने आपल्या कौशल्याने पुन्हा एकदा सर्वांना चकित केलं आहे.

अवश्य वाचा – D. B. Deodhar Trophy : भारत ब संघाला विजेतेपद

इशान पोरेलच्या गोलंदाजीवर भारत ब संघाचा कर्णधार पार्थिव पटेलच्या बॅटची कड घेऊन चेंडू मागे गेला. यावेळी दिनेश कार्तिकने चेंडूचा अंदाज घेत सुपरमॅनलाही लाजवेल अशी उडी मारत एका घातात झेल घेतला. कार्तिकच्या या प्रयत्नामुळे पार्थिव पटेल अवघ्या १४ धावा काढून माघारी परतला.

मात्र दुर्दैवाने भारत क संघाला फलंदाजीत सातत्य राखता आलं नाही. धावांचा पाठलाग करताना, भारत क संघाची सुरुवातही खराब झाली. कर्णधार शुभमन गिल अवघी १ धाव काढून माघारी परतला. यानंतर प्रियम गर्गने मयांक अग्रवालच्या जोडीने , संघाचा डाव सावरला. मात्र ही जोडी फुटल्यानंतर भारत क ची घसरगुंडी उडाली. अखेरच्या फळीत अक्षर पटेल, जलज सक्सेना आणि मयांक मार्कंडे यांनी फटकेबाजी करत छोटेखानी खेळी केल्या, मात्र त्यांची झुंज अपयशीच ठरली. भारत ब संघाकडून शाहबाज नदीमने ४, मोहम्मद सिराजने २, रुष कलारियाने १ बळी घेतला.

अवश्य वाचा – सय्यद मुश्ताक अली टी-२० : मुंबईच्या संघाची घोषणा