भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक बर्‍याच दिवसांपासून संघापासून दूर होता. २०१९च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यापासून कार्तिक भारतीय संघात परतला नाही. त्यामुळे तो आता त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यावर आला आहे. आयपीएलच्या १४व्या हंगामातही कार्तिकला मोठी कामगिरी करता आली नाही. असे असूनही तो आता पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला असेल.

कार्तिक खेळाडू म्हणून नव्हे तर एका नव्या भूमिकेसाठी या स्पर्धेला हजेरी लावणार आहे. कार्तिक आणि माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर या दोन भारतीयांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात समालोचाकाची भूमिका मिळाली आहे. त्यामुळे भारत-न्यूझीलंडच्या खेळाडूंव्यतिरिक्त कार्तिकलाही या सामन्यात चाहत्यांना पाहता येणार आहे. १८ जून ते २२ जून असा हा सामना साऊथम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल येथे होईल. कार्तिकला भारतीय संघासाठी तिन्ही स्वरूपात खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने १७ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, पण सध्या तो गेल्या २ वर्षांपासून संघाबाहेर आहे.

हेही वाचा – WTC FINAL : भारत-न्यूझीलंडमधील सामन्यात असणाऱ्या ‘या’ नव्या अटी तुम्ही वाचल्या का?

‘द हंड्रेड’मध्येही कार्तिक दिसणार

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या लीग ‘द हंड्रेड’मध्येही कार्तिक समालोचकाच्या भूमिकेत असेल. अधिकृत भागीदार स्काय स्पोर्ट्सने ‘द हंड्रेड’साठी समालोचकांचे पथक जाहीर केले आहे. कार्तिक व्यतिरिक्त अँड्र्यू फ्लिंटॉफ, स्टुअर्ट ब्रॉड, केव्हिन पीटरसन, कुमार संगकारा हे देखील या पॅनेलमध्ये समाविष्ट आहेत. २१ जुलैपासून या लीगला सुरुवात होईल.

हेही वाचा – “पाकिस्तानी चाहते प्रशिक्षकालाच शिव्या घालतात, म्हणून मला प्रशिक्षक व्हायचं नाही”

आयपीएल २०२१ स्थगित

भारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले. आज शनिवारी (२९ मे) बीसीसीआय आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी बैठक बोलावून चर्चा करणार आहे.