पहिल्या टी २० सामन्यात भारतीय गोलंदाजांना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगले चोपून काढले. सिफर्टच्या ८४ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने भाताला २२० धावांचे डोंगराएवढे आव्हान दिले. या सामन्यात भारताच्या संघाने महेंद्रसिंग धोनी बरोबरच ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक असे दोन यष्टीरक्षक खेळवले. पण यष्टिरक्षणाची जबाबदारी धोनीवर असल्याने हे दोघे मैदानावर इतर ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसले. मात्र क्षेत्ररक्षणाच्या मुद्द्यावर दिनेश कार्तिक चांगलाच चर्चेत राहिला.

दिनेश कार्तिकने सामन्यात दोन अतिशय सोपे झेल सोडले. तर एक कठीण असा झेल सीमारेषेवर झेलला. दमदार फलंदाजी करणारा सिफर्ट याने जेव्हा चेंडू उंच हवेत टोलवला, तेव्हा कार्तिक तो झेल सहज टिपेल असे वाटत होते. मात्र कार्तिकने तो झेल सोडला. त्यानंतर सिफर्टने सामन्यात तब्बल ८४ धावांची खेळी केली. त्यानंतर डॅरेल मिचेल याचा झेल मात्र त्याने उत्तम पद्धतीने टिपला.

पण त्यानंतर पुन्हा १८व्या षटकात अतिशय सोपा समजला जाणारा झेल त्याने सोडला. हा झेल अनुभवी रॉस टेलरचा होता. मुख्य म्हणजे या तीनही घटना पंड्या बंधूंच्या गोलंदाजीवर झाल्या. सिफर्टचा झेल कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर सुटला होता. तर बाकीच्या दोन घटनांमध्ये हार्दिक गोलंदाजी करत होता. त्याच्या या ढिसाळ क्षेत्ररक्षण करण्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले.

दरम्यान, फलंदाजीतही दिनेश कार्तिकला फारशी चमक दाखवता आली नाही.