कलात्मक जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेत आश्वासक प्रारंभ

भारताची अव्वल जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्मकारने व्हॉल्ट प्रकाराच्या पात्रता फेरीत तिसरा क्रमांक मिळवताना कलात्मक जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

दीपाने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावले होते. त्यानंतर दुखापतीमुळे ती काही काळ खेळापासून लांब होती. मात्र आता पुनरागमन केल्यानंतर तिने गुरुवारी झालेल्या पात्रता फेऱ्यांमध्ये १४.४६६ आणि १४.१३३ गुणांची नोंद केली. त्यामुळे तिच्या कामगिरीची सरासरी १४.२९९ ठरली. अमेरिकेच्या जेड कॅरेने १४.७०० गुणांसह अव्वल तर मेक्सिकोच्या अ‍ॅलेक्सा मोरेनोने १४.५३३ गुणांसह द्वितीय स्थान मिळवले. या पात्रता फेरीतील प्रारंभीच्या आठ खेळाडूंना या पात्रता फेरीतून अंतिम फेरीत पुढे जाण्याची संधी मिळाली असून त्यात दीपाचा समावेश आहे. व्हॉल्टची अंतिम फेरी ही शनिवारी होणार असून त्यापूर्वी दीपा ही बॅलन्स बीम प्रकारातदेखील सहभागी होणार आहे.

दीपाची कामगिरी निश्चितच चांगली झाली आहे. त्यामुळे शनिवारच्या कामगिरीनंतर पदकविजेत्यांमध्ये तिचीदेखील दावेदारी राहणार आहे. ती या स्पर्धेमध्ये पदक पटकावून ऑलिम्पिक पात्रतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल, अशी अपेक्षा असल्याचे भारतीय जिम्नॅस्टिक्स महासंघाचे उपाध्यक्ष रियाझ भाटी यांनी सांगितले.