उंच उडी मारण्याची भीती वाटणाऱ्या दीपा कर्माकरची यशोगाथा

वय वर्षे सहा.. खरे तर हे बागडण्याचे वय.. पण उंच उडी मारताना तिला भीती वाटायची. मात्र वडिलांची इच्छा होती तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरची जिम्नॅस्ट बनवण्याची. त्यासाठी मुलीला त्यांनी त्या कोवळ्या वयातच भीतीवर मात करायला लावले. तिनेही वडिलांवर विश्वास ठेवत त्यांची इच्छा पूर्ण केली. सध्या तिने ‘आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक’मध्ये ऑलिम्पिकचे तिकिट मिळवत गगन भरारी घेतली. हा मान देशातून पहिल्यांदाच पटकावणाऱ्या दीपा कर्माकर हिच्या यशोगाथेचे टप्पे विलक्षण आहेत.

छोटय़ा शहरांमधल्या लोकांमध्ये मोठे होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असते. प्रामाणिकपणा, चिकाटी, जिद्द आणि ठरवलेले लक्ष्य गाठण्यासाठी लागणारी अथक मेहनत घेण्याची तयारी असते. तिच्या वडिलांनाही आपली मुलगी मोठी व्हावी, जगात चांगले नाव मिळवावे, असेच वाटत होते. तिचे वडील आगरताळाच्या क्रीडा प्राधिकरणामध्ये वेटलिफ्लिंट प्रशिक्षक होते. पण त्यांनी तिची कारकीर्द या खेळात घडवण्याचे ठरवले नाही. तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्ट म्हणून पाहायचे स्वप्न त्यांनी जोपासले आणि ते प्रत्यक्षात उतरवले.

२०११ च्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने पाच सुवर्णपदक पटकावले आणि ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर २०१४ साली तिने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. तिच्या या कामगिरीचे कौतुक दस्तुरखुद्द भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही केले.

रिओ दि जानेरो येथील ऑलिम्पिक चाचणी आणि अंतिम पात्रता स्पर्धेत तिने ५२.६९८ गुण पटकावले आणि ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला. आता साऱ्यांनाच तिच्याकडून अपेक्षा असेल ती पदकांची, पण त्यापेक्षाही तिने मिळवलेल्या ऑलिम्पिक प्रवेशाने भारताची मान अभिमानाने उंचावली आहे हे निश्चित.

सुवर्णपदक

ऑलिम्पिक चाचणी आणि पात्रता अंतिम स्पर्धेच्या कलात्मक प्रकारात २२ वर्षीय दीपाने व्होल्ट्स प्रकारामध्ये १८.८३३ गुण कमावत सुवर्णपदक पटकावले, दीपाची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

जिम्नॅस्टसाठी शरीरातल्या लवचिकतेबरोबर पायाचा तळवाही महत्वाचा असतो. दीपाच्या पायाचा तळवा एकदम सपाट होता. त्यामुळे जिम्नॅस्टिकमध्ये तिची कारकीर्द होऊ शकत नाही, असे काही जणांना वाटले होते.

पण प्रशिक्षक बिसवेस्वर नंदी यांनी तिच्याकडून घोटीव मेहनत करून घेतली. त्यांची ही मेहनत एवढी फळली, की दीपा थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंशी स्पर्धा करू लागली.