भारताची महिला जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकर हिने रिओ ऑलिम्पिकमधील उल्लेखनीय कामगिरीने भारतीयांची मने जिंकली. कलात्मक जिम्नॅस्टिक्सच्या व्हॉल्टमध्ये प्रोड्युनोव्हा प्रकारात दीपाचा हातखंडा असून, याच प्रकारातील तिच्या दमदार कामगिरीमुळे तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. देशातील महिला खेळाडूंसाठी दीपाकडे प्रेरणास्थान म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.

वाचा: टोकियोत सुवर्ण जिंकणारच!- दीपा

दीपाचा आजवरचा प्रवास देशातील जनतेला नक्कीच प्रेरणा देणारा ठरू शकतो. त्यामुळे तिच्या चरित्रपटासाठी लवकरच सुरूवात केली जाणार असल्याचीही माहिती समोर आली. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंवर याआधी देखील अनेक चरित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांना प्रेक्षकांनी चांगली पसंती देखील दिली होती. आता दीपा कर्माकरच्या चरित्रपटाची चर्चा सुरू झाली असताना तिला याबाबत विचारले असता तिने एक कठीण मागणी केली.

तुझ्यावर चित्रपट तयार होत असेल तर कोणत्या अभिनेत्रीने तुझी भूमिका करावी? असे दीपाला एका इंग्रजी वृत्तपत्राने विचारले असता ती म्हणाली की, खरंच असं होणार असेल, तर ज्यास प्रोड्युनोव्हा करता येत असेल तिने माझी भूमिका साकारावी. अर्थात दीपाची ही मागणी खूप आव्हानात्मक असली तरी तिने चरित्रपटाबाबत सकारात्मक प्रतिसाद देखील दिला. कतरिना कैफ ही माझी आवडती अभिनेत्री राहिली आहे आणि माझ्यावर चित्रपट करण्याचा कुणी विचार करत असेल तर दिग्दर्शकाने त्यांना योग्य वाटेल त्या अभिनेत्रीची निवड करावी. माझी कहाणी मोठ्या पडद्यावर येणार, हे माझ्यासाठी सन्मानपात्र आहे, असेही दीपा पुढे म्हणाली.

वाचा: दीपा कर्माकरच्या राज्यात…

दीपाला यंदा रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत चौथे स्थान मिळाले. जिन्मॅस्टिक्सच्या व्हॉल्ट प्रकारातील दीपाचे कांस्य पदक अवघ्या ०.१५० गुणांनी हुकले होते. तरीही भारताच्या एका महिला जिन्मॅस्टिक्सपटूने केलेली ही कामगिरी देशासाठी ऐतिहासिक ठरली आहे. संपूर्ण देशातून दीपाने केलेल्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव केला गेला. याशिवाय, दीपाला खेलरत्न पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला आहे.