दिपा कर्माकर हे नाव आज भारतामधील क्रिडा प्रेमींच्या चांगलेच परिचयाचे आहे. ग्लास्गो येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत २०१४ साली कांस्य पदक जिंकून दिपाने आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक वॉल्टची अंतिम फेरी गाठत तिने इतिहास रचला होता. ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी दिपा पहिली भारतीय महिला ठरली. त्यानंतर मागील वर्षी झालेल्या आर्टिस्टीक जिमनॅस्टीक विश्वचषकात दिपाने सुवर्णपदकाची कमाई केली. दिपाच्या या आत्तापर्यंतच्या यशस्वी प्रवासाची दखल बाहुल्या बनवणाऱ्या जगप्रसिद्ध बार्बी कंपनीने घेतील आहे. आपल्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त बार्बी बाहुल्या तयार करणाऱ्या ‘मेटेल’ कंपनीने विविध क्षेत्रामध्ये अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ त्यांच्या बार्बी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये भारताला जिम्नॅस्टिकमध्ये नवी ओळख मिळवून देणाऱ्या दिपाचाही समावेश आहे.

बार्बीने सुरु केलेल्या ‘रोल मॉडल’ या मोहिमेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या महिलांनाचा कंपनीमार्फत आगळ्यावेगळ्या माध्यमातून कौतूक करण्यात आले आहे. आपल्या कामगिरीने एखादे क्षेत्र गाजवणाऱ्या मोजक्या महिलांच्या बार्बी बाहुल्या कंपनी तयार करणार केल्या आहेत. दिपाने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन स्वत:च्या बार्बी बाहुलीबरोबरचा फोटो ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

दिपाच्या सन्मामार्थ तयार करण्यात आलेली बार्बीही जिम्नॅस्टिकच्या पोशाखत असून तिच्या गळ्यामध्ये कांस्य पदक दाखवण्यात आले आहे.

‘रोल मॉडल’ या मोहिमेमध्ये खऱ्याखुऱ्या आयुष्यातील १९ यशस्वी महिलांच्या बार्बी प्रतिकृती ‘मेटेल’ कंपनीने तयार केल्या आहेत. जगभरातील १७ देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांच्या बाहुल्या कंपनीने विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत.

‘ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिकच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला होण्याची ऐतिसिक कामगिरी दिपाने केली आहे. अगदी छोट्या फरकाने ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाने तिला हुलकावणी दिल्याने तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. ‘प्रोड्युनोवा’ हा महिला जिम्नॅस्टिकमधील सर्वात कठीण प्रकार असून त्यामध्ये दीपाचा हातखंड आहे. हा प्रकार यशस्वीरित्या करणाऱ्या पाच महिलांमध्ये दिपाचा समावेश आहे. अनेक अडथळे पार करत तिने हा प्रवास केला असून तरुण मुलींनी जिमनॅस्टिकडे वळावे यासाठी ती प्रेरणास्त्रोत ठरली आहे,’ असं कंपनीने आपल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.

दिपाने ही बातमी ट्विटवरुन शेअर केल्यानंतर अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

देशासाठी प्रेरणास्त्रोत

प्रेरणास्त्रोत

छान दिसतेस

तू यासाठी पात्र आहेस

खऱ्या सुंदरतेचा सन्मान

भारताचे नशीब

२५ वर्षीय दिपाने आत्तापर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन आत्तापर्यंत एकूण ७७ पदके जिंकली असून त्यामध्ये ६७ सुर्वण पदकांचा समावेश आहे.