क्रिकेटपटू झाले की आर्थिक प्रश्न मिटतो, सारी स्वप्ने पूर्ण होतात. हे झाले एक सर्वसामान्य ध्येय. पण कालांतराने तेथेही क्रिकेटपटूंना मोहात पाडणारे अनेक सुवर्णमृग जन्माला आले आणि क्रिकेटसारखा सभ्य माणसांचा खेळ कलुषित झाला. क्रिकेटपटू होऊन देशाचे नाव उंचावेन, भारताला विश्वचषक जिंकून देईन, ही स्वप्ने तर केव्हाच इतिहासजमा झाली. कसोटी क्रिकेट हे सर्वोच्च क्रिकेट. कसोटीपटू व्हावे, ही प्रेरणा गेली अनेक वष्रे जागतिक क्रिकेटमध्ये जोपासली गेली होती. १९८३मध्ये भारताने विश्वचषक जिंकला आणि भारतात क्रिकेट नावाचा वटवृक्ष आपली पाळेमुळे पसरून डौलाने उभा राहिला. पुढे १९८७मध्ये रिलायन्स कप विश्वचषक भारतीय उपखंडातच झाला. स्वाभाविकपणे क्रिकेटला अधिक पोषक वातावरण मिळाले. क्रिकेट हा आपला धर्म झाला आणि क्रिकेटपटू म्हणजे दैवत झाले. यातूनच क्रिकेटपटूंची स्वप्नेही बदलू लागली, त्यांना सुवर्णमृग खुणावू लागले.
२०००साली सर्वप्रथम हॅन्सी क्रोनिएची दिल्ली पोलिसांनी मॅच-फिक्सिंगसंदर्भात चौकशी केली. यात हर्शेल गिब्स, पीटर स्ट्रायडॉम, निकी बोए यांची नावे समोर आली. त्यानंतर मार्क वॉ, शेन वॉर्न, सलीम मलिक आणि अता-उर-रेहमान अशी नावेसुद्धा मॅच-फिक्सिंग आणि सट्टेबाजीसंदर्भात सिद्ध झाली. ऑक्टोबर २०००पर्यंत भारताचे नावसुद्धा मोहम्मद अझरुद्दीन, अजय जडेजा, अजय शर्मा आणि मनोज प्रभाकर यांच्यामुळे डागाळले. त्या वेळी कपिलदेव आणि नयन मोंगिया यांचीसुद्धा चौकशी झाली होती. पण त्यांना ‘क्लिन चीट’ मिळाली होती. त्या वेळी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात कपिलदेव ढसाढसा रडला होता. त्यानंतर देशात आणि जगभरात मॅच-फिक्सिंग, स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीची अनेक नवनवी प्रकरणे समोर आली. अगदी २०११मध्ये मोहालीत झालेला भारत-पाकिस्तान यांच्यातील उपांत्य फेरीचा सामनाही आधीच निश्चित होता, असा दावा करून ‘संडे टाइम्स’ने मध्यंतरी खळबळ माजवण्याचे कार्य केले होते.
२००८पासून आयपीएल या ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या ‘मालामाल’ फंडय़ाने जागतिक क्रिकेटला मोहिनी घातली. देशोदेशीचे क्रिकेटपटू वेळप्रसंगी राष्ट्रीय क्रिकेट संघटनेशी बंड करून आयपीएल खेळण्यासाठी आसुसल्याचे चित्र दिसू लागले. प्रत्येक फ्रँचायझीकडे ३५-४० खेळाडू करारबद्ध असल्यामुळे बऱ्याच खेळाडूंना आर्थिक रसद या आयपीएलमुळे मिळू लागली. हीच हाव मग वाढत गेली. अनेक क्रिकेटपटू आयपीएल खेळण्याचे माफक पण लाभदायी स्वप्न जोपासू लागले. देशाकडून खेळण्यापेक्षा पैसा हेच खेळाडूंना सर्वस्व वाटू लागले. २०१२मध्ये जेव्हा पाच क्रिकेटपटूंचे स्पॉट-फिक्सिंग प्रकरण समोर आले, तेव्हाच आयपीएलमध्ये खूप पाणी मुरलेले आहे, याची प्रचीती सर्वाना आली होती. लाखो-कोटी डॉलर्सला विकले जाणारे संघ, खेळाडू आणि त्यांचे आर्थिक व्यवहार हे सारेच संशयास्पद असल्याचे चित्र ताज्या स्पॉट-फिक्सिंग स्फोटामुळे पुढे आले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित चव्हाण, हरयाणाचा ऑफ-स्पिनर अजित चंडिला आणि गुजरातचा वेगवान गोलंदाज अमित सिंग या चौघांना ‘स्पॉट-फिक्सिंग’प्रकरणी अटक झाली आणि भारतीय क्रिकेट पुन्हा नखशिखांत हादरले. या पैशाच्या मोहापायी ‘स्पॉट-फिक्सिंग’कडे वळलेल्या चौघांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा वेध-

अंकित चव्हाण : कोण होतास तू, काय झालास तू?
क्रिकेट म्हणजे प्राणवायू मानल्या जाणाऱ्या मुंबईत अंकित चव्हाणची कारकीर्द आता कुठे बहरायला लागली होती. गेली पाच वष्रे मुंबईच्या क्रिकेटमध्ये तो स्थिरावला होता. २००८-०९पासून तो मुंबईकडून रणजी खेळू लागला, तर २०१२पासून राजस्थान रॉयल्सशी करारबद्ध झाला. परंतु कोणत्याही वाईट कारणासाठी त्याचे नाव कधीच पुढे आले नव्हते. पण स्पॉट-फिक्सिंग प्रकरणामुळे ती आणखी बहरण्यापूर्वीच खुंटण्याची शक्यता आहे. या वर्षी मुंबईने चाळिसाव्या रणजी करंडकाला गवसणी घातली. या जेतेपदात अष्टपैलू अंकितचा मोलाचा वाटा आहे. या मोसमातील १० रणजी सामन्यांत मुंबईकडून सर्वाधिक ३३ बळी डावखुरा फिरकी गोलंदाज अंकितच्या नावावर आहेत. वानखेडे स्टेडियमवरील पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने एका डावात नऊ बळी घेण्याची किमया साधली होती. तेव्हा हा गोलंदाज लवकरच भारतीय संघात दिसल्यास मुळीच आश्चर्य वाटायला नको, असे सर्वाना वाटले होते. त्यानंतर इराणी करंडक स्पध्रेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकरसोबत त्याने झुंजार भागीदारी रचून मुंबईचा डाव सावरला होता. गेल्या वर्षीच्या रणजी हंगामात मध्य प्रदेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत अंकितने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले पहिलेवहिले शतकही झळकावले होते. त्यामुळे मुंबई संघातले इक्बाल अब्दुल्लाचे स्थानही त्याने आपल्या कामगिरीने मिळवले होते.

एस. श्रीशांत : वादग्रस्त
‘‘क्रिकेट म्हणजे माझे जीवन आहे आणि मैदानावर मी १०० टक्के प्रयत्नांनिशी खेळतो,’’ हे ब्रीदवाक्य एस. श्रीशांत बऱ्याचदा सहजपणे बोलून जातो. पण वाद हे श्रीशांतच्या हातात हात घालूनच नेहमी वावरत होते. केरळच्या या गुणवान गोलंदाजाचे नाव मोठे झाले, पण चुकीच्या कारणांमुळेच अधिक झाले. भारतीय क्रिकेट संघात प्रवेश करण्यापूर्वी २००५च्या चॅलेंजर्स ट्रॉफी क्रिकेट स्पध्रेत त्याने सचिन तेंडुलकरला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मग देशाकडून खेळताना मॅथ्यू हेडन, अॅन्ड्रय़ू सायमंड्स या फलंदाजांनाही त्याने उपहासाने डिवचले होते. २००८च्या आयपीएलमध्ये हरभजन सिंगने थप्पड मारल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या हंगामात ते प्रकरण श्रीशांतने पुन्हा उगाळून काढले होते. ३० वर्षीय श्रीशांतचे नाव काही वर्षांपूर्वीसुद्धा सट्टेबाजीशी जोडले गेले होते. पण त्या वेळी त्याने ते फेटाळून लावले होते.
‘गोपू’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या श्रीशांतला खरे तर लेग-स्पिनर व्हायचे होते. पण त्यानंतर तो वेगवान गोलंदाजीकडे वळला आणि चेन्नईच्या एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये दाखल झाला. क्लब आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नाव कमवत असतानाच श्रीशांतला ‘प्रिन्स ऑफ हॅट्ट्रिक्स’ ही आणखी एक उपाधी मिळाली. मैदानावर अनपेक्षित आणि आक्षेपार्ह वागणारा हा क्रिकेटपटू मानसशास्त्र विषयातून पदवीधर आहे, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. २७ कसोटी सामन्यांत ८७ बळी आणि ५३ एकदिवसीय सामन्यांत ७५ बळी ही श्रीशांतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द. पण आता त्यापुढे पूर्णविराम दिला जाण्याची चिन्हे आहेत.
२०१०मध्ये श्रीशांतचा केरळ क्रिकेट असोसिएशनशी वाद झाला होता. पण नंतर तो मिटविण्यात आला होता. मागील स्थानिक हंगामात तामिळनाडूचा कर्णधार दिनेश कार्तिकला डिवचल्याप्रकरणी बीसीसीआयने त्याच्यावर दोन महिन्यांची बंदी घातली होती. पण तरीही श्रीशांतच्या स्वाभावामध्ये कोणताही बदल झाला नाही. मॉडेलिंग आणि नृत्य याचीही श्रीशांतला आवड आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांचे प्रस्तावही त्याच्यापुढे आले होते. काही वर्षांपूर्वी नृत्यविषयक एका रिअॅलिटी शोमध्येही श्रीशांत सहभागी झाला होता. ‘स्पॉट-फिक्सिंग’प्रकरणी अटक झाल्यानंतर आता ‘फॅमिली ड्रामा’ सुरू आहे. त्याच्या कुटुंबीयांनी थेट महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग यांना दोषी ठरवले आहे. (नंतर त्यांनी त्याबद्दल माफीही मागितली.)

अजित चंडिला : पक्का ‘जुगाडू’
आयपीएलच्या मागील हंगामात ऑफ-स्पिनर अजित चंडिलाने पुणे वॉरियर्सविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदवली होती, तोवर हे नाव कुणालाच माहीत नव्हते. २०१०मध्ये अजितने आपल्या हरयाणा राज्याच्या रणजी संघात स्थान मिळवले. परंतु त्याची कारकीर्द दोन सामन्यांपुरतीच मर्यादित राहिली. गोलंदाजीच्या संशयास्पद शैलीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि मग शैलीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्याला बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठविण्यात आले. मग त्यानंतर अजित राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये करारबद्ध होऊन खेळू लागला, याचे सर्वानाच आश्चर्य वाटले. कागदोपत्री त्याचे वय २९ वष्रे असले तरी काही जणांनी तो तिशीच्या पुढील आहे, असे म्हटले आहे. फरिदाबादचा निवासी असलेल्या चंडिलाचा प्रारंभीच्या दिवसांत क्लब क्रिकेटमधून मिळणाऱ्या पैशातून उदरनिर्वाह चालायचा. सात वर्षांपूर्वी तो क्लब क्रिकेटमधून प्रत्येक सामन्यासाठी मिळणाऱ्या दोन हजार रुपयांसाठी दिल्ली, कोलकाता येथेसुद्धा जायचा. मग त्याला एअर इंडियात नोकरी मिळाली. पण क्रिकेटच्या पलीकडे क्रिकेटच्या साहित्याच्या व्यापाराचा जोडधंदाही तो इमाने-इतबारे करीत होता. याच माध्यमाने अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या तो संपर्कात असायचा. दिल्लीमधील अनेक क्रिकेट अकादम्यांना चंडिला शूज आणि टी-शर्ट्स पुरवायचा. याचप्रमाणे खेळाडूंना क्लब्सचे करारही तो सहज मिळवून द्यायचा. त्यामुळे या ‘जुगाडू’ वृत्तीनेच त्याचा घात केला.

अमित सिंग : क्रिकेटपासून दुरावला, सट्टेबाजीत सरावला!
वेगवान गोलंदाज अमित सिंगला अन्य तीन खेळाडूंसोबतच अटक झाली. पण सट्टेबाज म्हणून अटक झालेला अमित म्हणजे मुळचा राजस्थान रॉयल्सचाच माजी खेळाडू असल्याचे दुसऱ्या दिवशी स्पष्ट झाले. ३१ वर्षीय अमित २००४पासून गुजरातकडून रणजी क्रिकेट खेळतोय. या वर्षी बीसीसीआयने जाहीर केलेल्या आयपीएलमधील खेळाडूंच्या यादीत संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीमुळे अमितचे नाव नव्हते. मागील चार हंगामांमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा तो नियमित सदस्य होता. परंतु यादीत नसलेल्या खेळाडूंचा संघात समावेश करू नये, अशा बीसीसीआयच्या फतव्यामुळे अमितचे नाव संघ व्यवस्थापनाला वगळावे लागले. मागील हंगामात सौराष्ट्रविरुद्धच्या रणजी करंडक सामन्यात अमितवर सर्वप्रथम संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे गुजरात क्रिकेट संघातून त्याला वगळण्यात आले आणि स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने शैलीत सुधारणा करावी, असा सल्ला देण्यात आला. पण त्याआधी आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात याच अमित सिंगला संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीमुळे दक्षिण आफ्रिकेतून माघारी पाठविण्यात आले होते. त्यामुळे दिवसेंदिवस तो क्रिकेटपासून दूर जाऊ लागला होता. त्यामुळेच तो या सट्टेबाजीच्या जाळ्यात गुंतला गेला, असे म्हटले जात आहे.