मुंबई : बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केली. सुवर्णपदकांची लयलूट करून पदकतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या महाराष्ट्राला बुधवारी एकाही सुवर्णपदकाची नोंद करता आली नाही.

खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत मजल मारली असून टेनिसमध्ये आर्यन भाटिया आणि मिहिका यादव यांनी अंतिम फेरी गाठली आहे. बॉक्सिंग या खेळात मितिका गुणेले हिने उपांत्य फेरी गाठून पदक निश्चित केले असून बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलमध्ये भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

खो-खो : दोन्ही संघ अंतिम फेरीत

खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने पंजाबचा तर मुलांमध्ये तामिळनाडूचा पराभव करून अंतिम फेरीत मजल मारली. महाराष्ट्राच्या मुलींनी पंजाबचा ७-६ असा ५ मिनिटे आणि एका गुणाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या श्रुती शिंदेने ३:००, ३:०० मिनिटे संरक्षण करताना आपल्या खेळाची चमक दाखवली. किरण शिंदेने २:२०, ३:२० मिनिटे संरक्षण केले. अश्विनी मोरेने २:४०, २:३० मिनिटे संरक्षण केले. मुलांच्या संघाने तामिळनाडूवर १२-०६ असा एक डाव ६ गुणांनी विजय संपादन केला. महाराष्ट्राच्या रोहन कोरेने ३:३० मि. संरक्षण व १ गडी तसेच विजय शिंदेने २:५० मि. संरक्षण करत २ गडी बाद केले.

टेनिस : आर्यन, मिहिका अंतिम फेरीत

आर्यन भाटिया (१७ वर्षांखालील मुले) आणि मिहिका यादव (२१ वर्षांखालील मुली) या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपापले सामने जिंकून टेनिसमध्ये अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या गार्गी पवार, प्रेरणा विचारे यांनीही आगेकूच कायम राखली. आर्यनने हरयाणाचा अग्रमानांकित सुशांत दबसवर ७-५, ३-६, ६-२ असा सनसनाटी विजय मिळविला. मिहिकाने उपांत्य फेरीत उत्तर प्रदेशच्या काव्या सवानी हिच्यावर ६-३, ६-३ असा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळविला. गार्गीने हरयाणाच्या अंजली राठी हिच्यावर ६-२, ६-७ (४-७), ६-३ अशी मात केली. प्रेरणाने तामिळनाडूच्या एस. पांडिथिरा हिला ४-६, ६-३, ७-६ (७-५) असे पराभूत केले.

बॉक्सिंग : मितिकाचे पदक निश्चित

महाराष्ट्राच्या मितिका गुणेले हिने १७ वर्षांखालील मुलींच्या विभागात विजयी वाटचाल कायम ठेवत उपांत्य फेरी गाठली आणि किमान कांस्यपदक निश्चित केले. तिने ६६ किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत हरयाणाच्या अन्नू राणी हिचा ५-० असा सहज पराभव केला. पहिल्या फेरीपासून लढतीवर नियंत्रण मिळवत मितिकाने तिन्ही फेऱ्यांमध्ये आक्रमक ठोसेबाजी करत अन्नूला फारशी संधी दिली नाही. महाराष्ट्राच्या आकाश गोरखा याने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात ५७ किलो वजनी विभागात थांगजामचा याच्यावर ३-२ अशी मात केली. ६० किलो गटात महाराष्ट्राच्या लैश्राम सिंगने आसामच्या इमदाद हुसेनचे आव्हान ५-० असे संपुष्टात आणत पदकाच्या दिशेने वाटचाल केली.

बास्केटबॉल : मुलांमध्ये संमिश्र यश

बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश लाभले. मुलींच्या २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राने बाद फेरीच्या आशा कायम राखत कर्नाटकला ८०-७४ असे पराभूत केले. पूर्वार्धात महाराष्ट्राने ४१-३६ अशी आघाडी घेतली होती. श्रुती शेरेगर, अंशिका कनोजिया, ऋतुजा पवार व श्रेया दांडेकर यांनी विजयात उल्लेखनीय खेळ केला. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या बाद फेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत. बलाढय़ पंजाबच्या आक्रमणापुढे महाराष्ट्राला ४८-७२ असा पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राकडून प्रीतिश कोकाटे व रझा शेख यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

व्हॉलीबॉल : आंध्र प्रदेशकडून पराभव

महाराष्ट्राला १७ वर्षांखालील मुलांच्या विभागात आंध्र प्रदेशकडून २६-२४, २५-१४, २५-२० असे पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्राच्या खेळांडूंनी कडवी लढत दिली. मात्र आक्रमक खेळ करत पवन कल्याण व साईराम यांच्या अष्टपैलू खेळामुळे आंध्र प्रदेशने हा सामना जिंकला. महाराष्ट्राच्या केशव गायकवाड व व्ही. आदित्य यांनी चांगली झुंज दिली.

कबड्डी : उपांत्य फेरीत धडक

महाराष्ट्राच्या खेळाडूंची निराशाजनक कामगिरी सुरू असतानाच महाराष्ट्राच्या २१ वर्षांखालील मुलींच्या संघाने कबड्डीमध्ये उपांत्य फेरीत स्थान मिळविले. त्यांनी साखळीतील शेवटच्या लढतीत उत्तर प्रदेशचा ३८-२३ असा पराभव केला. महाराष्ट्राने पूर्वार्धात २०-१४ अशी आघाडी घेतली होती. ही आघाडीच महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरली. महाराष्ट्राच्या सोनाली हेळवी व आसावरी खोचरे यांनी केलेल्या खोलवर चढायांपुढे उत्तर प्रदेशचा बचाव निष्प्रभ ठरला.