टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तिरंदाजी क्रीडाप्रकारात भारतीय खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. महिलांमध्ये दीपिका कुमारीने तर पुरुषांच्या संघानेही क्रमवारीत नववे स्थान मिळवले.

महिलांच्या गटात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या दीपिकाने ६६३ गुणांसह नववे स्थान मिळवले. मध्यांतराच्या अखेरीस ती चौथ्या क्रमांकावर होती. परंतु नंतर कामगिरी उंचावण्यात अपयशी ठरल्यामुळे तिची क्रमवारीत घसरण झाली. उपांत्यपूर्व फेरीत दीपिकाला कोरियाच्या अ‍ॅन सनला सामोरे जावे लागू शकते. सनने क्रमवारी फेरीत ६८० गुणांसह अग्रस्थान कमावतानाच २५ वर्षांपूर्वीचा ऑलिम्पिक विक्रमही मोडीत काढला.  पुरुष आणि मिश्र दुहेरीमध्येही उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडूंसमोर कोरियाचे आव्हान असेल. अतानू दास, प्रवीण जाधव आणि तरुणदीप राय यांचा पुरुष संघात समावेश होता. एकेरी गटात प्रवीणला ३१व्या, तर अतानूला तब्बल ३५व्या स्थानी समाधान मानावे लागले.

मिश्र दुहेरीत दीपिका प्रवीणसह खेळणार

क्रमवारी फेरीत महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवने अतानू दासपेक्षा चमकदार कामगिरी केल्यामुळे मिश्र दुहेरी फेरीत दीपिका कुमारीच्या साथीने प्रवीण भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारतीय तिरंदाजी महासंघाने हा निर्णय घेतला असून शनिवारी होणाऱ्या मिश्र दुहेरी फेरीत भारताला पदक मिळवण्याची सर्वाधिक संधी असल्याचे म्हटले जात आहे. दीपिका-अतानू दाम्पत्याने काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विश्वचषकात सुवर्णपदक पटकावले होते. परंतु तिरंदाजी महासंघाने प्रवीणला प्राधान्य देण्याचे ठरवले.

माझी कामगिरी संमिश्र स्वरुपाची होती. यापुढील फेरीत नक्कीच सर्वोत्तम खेळ करेन!

-दीपिका कुमारी