News Flash

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : भारतावर पराभवाची नामुष्की

पुरुष दुहेरीतील विजयी परंपरा कायम राखूनही अखेर डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत शनिवारी भारताच्या पदरी निराशाच पडली.

(संग्रहित छायाचित्र)

दिमाखदार विजयासह इटलीचा प्रथमच मुख्य फेरीत प्रवेश

पुरुष दुहेरीतील विजयी परंपरा कायम राखूनही अखेर डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत शनिवारी भारताच्या पदरी निराशाच पडली. इटलीने पात्रता फेरीतील सामन्यात भारताला ३-१ अशी धूळ चारून प्रथमच मुख्य फेरी गाठली.

घरच्या प्रेक्षकांसमोर हिरवळीच्या कोर्टचा फायदा उचलण्यात भारतीय टेनिसपटू सपशेल अपयशी ठरले. शुक्रवारी पुरुष एकेरीचे पहिले दोन्ही सामने गमावणाऱ्या भारताला उर्वरित तिन्ही सामन्यांत विजय मिळवणे अनिवार्य होते. पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा व दिविज शरण यांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. इटलीच्या सिमोन बोएलेली व मॅटिओ बॅरेट्टिनी यांच्याशी एक तास व ४३ मिनिटे रंगलेल्या सामन्यात त्यांनी ४-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवला.

मात्र यानंतर झालेल्या पुरुष एकेरीच्या परतीच्या लढतीत जागतिक टेनिस क्रमवारीत ३७व्या स्थानी असलेल्या आंद्रेस सिप्पीने भारताच्या अव्वल मानांकित प्रज्ञेश गुणेश्वरनचा अवघ्या एका तासाच्या कालावधीत ६-१, ६-४ असा धुव्वा उडवला.

इटलीने पुरुष एकेरीचे तीन सामने जिंकल्यामुळे पाचवा सामना खेळण्याची गरजच भासली नाही. शुक्रवारी भारताच्या प्रज्ञेश व रामकुमार रामनाथन यांना पराभव पत्करावा लागला होता. भारताने १९८५मध्ये हिरवळीवरच इटलीविरुद्ध शेवटचा विजय मिळवला होता.

आमचा खेळ अतिशय निराशाजनक झाला. शुक्रवारीच आम्ही विजयाची संधी दवडली. ०-२ अशा पिछाडीवर असताना पुनरागमन करणे कठीण होते. टेनिसमधील सद्य:परिस्थितीवर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

– महेश भूपती, भारताचा न खेळणारा कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 12:59 am

Web Title: disappointment of indias defeat
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : विदर्भ-सौराष्ट्र यांच्यात आजपासून विजेतेपदासाठी झुंज  
2 VIDEO : बाऊन्सर खेळाडूच्या मानेवर आदळला अन् … काळजाचा ठोका चुकला
3 मराठमोळी स्मृती ICC Rankingमध्ये अव्वल स्थानावर
Just Now!
X