क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांची ग्वाही

पीटीआय, नवी दिल्ली

जपानला जाणाऱ्या भारताच्या ऑलिम्पिक पथकासाठी करोनाच्या पाश्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या कडक र्निबधांमध्ये कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले. याबाबत औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली असून, लवकरच समस्येकडे लक्ष दिले जाईल, असे रिजिजू यांनी सांगितले.

करोनाची साथ अद्याप काही देशांमध्ये तीव्र स्वरूप असल्यामुळे २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी भारतासह ११ देशांच्या पथकांसाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. भारतीय क्रीडापटू आणि अधिकाऱ्यांना जपानला निघण्यापूर्वी दररोज सात दिवस करोना चाचणी आवश्यक आहे. त्यानंतर टोक्योला पोहोचल्यावरही पुढील तीन दिवस अन्य कोणत्याही देशाच्या खेळाडूच्या संपर्कात न येणे, अशा नियमांचा यात समावेश आहे. या धोरणाबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) नाराजी दर्शवली होती.

‘‘ऑलिम्पिक धोरणानुसार कोणत्याही देशाशी भेदभाव केला जात नाही. समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जाते. ‘आयओए’ने ऑलिम्पिक संयोजन समितीकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. भारतीय क्रीडापटूंची तयारी आणि संधीवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही मुद्दय़ांबाबत आम्ही जोरदार आवाज उठवू,’’ असे रिजिजू यांनी सांगितले. यंदाचे ऑलिम्पिक हे आव्हानात्मक वातावरणात होत आहे. हे आव्हान प्रत्येकापुढील आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

भारतातून निघण्यापूर्वीच्या क्रीडापटूंच्या करोना चाचण्यांचा नियम शिथिल करावा, अशी विनंती ‘आयओए’ने केली आहे. ‘‘भारतीय खेळाडूंचा सराव आणि सहभाग सुरक्षित वातावरणात असावा, हाच आमचाही हेतू आहे. आपले खेळाडू कोणत्याही मानसिक तणावाखाली नाही, याची मी हमी देतो,’’ असे रिजिजू यांनी सांगितले.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा

भारताच्या सर्वोत्तम पदककमाईची आशा

’  भारत यंदा सर्वोत्तम पदककमाई करील, असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला. भारताने २०१२मध्ये ऑलिम्पिकमधील सर्वाधिक सहा पदके जिंकली होती. ‘‘भारताला अधिकाधिक पदके मिळावीत, यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. भारताला किती पदके मिळतील, हे एक क्रीडामंत्री म्हणून मला सांगता येणार नाही. आमच्या अपेक्षा मोठय़ा आहेत. यंदाचे ऑलिम्पिक भारतासाठी यशस्वी आणि संस्मरणीय ठरो अशी आशा करूया,’’ असे रिजिजू यांनी सांगितले.

ऑलिम्पिकपटूंच्या तयारीसाठी ११०० कोटी

’  ऑलिम्पिकपटूंच्या तयारीसाठी सरकारने गेल्या चार वर्षांत ११०० कोटी रुपये खर्च केला आहे, असे रिजिजू यांनी सांगितले. भारताच्या ऑलिम्पिकपटूंच्या कामगिरीबाबत रिजिजू यांनी समाधान प्रकट केले.