करोनाची साथ वाढत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) शुक्रवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या ऑनलाइन बैठकीत इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेटची सुधारित कार्यक्रमपत्रिका आणि देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम यासह विषयपत्रिकेमधील ११ मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा होईल.

भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाला आधीच कात्री लावण्यात आली आहे. मर्यादित षटकांच्या तीन मालिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. श्रीलंका आणि झिम्बाब्वेचे दौरे आणि मायदेशात होणारी इंग्लंडविरुद्धची मालिका रद्द करण्यात आली आहे.

‘आयपीएल’च्या आयोजनासाठी सर्व पर्यायांचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. पहिला पर्याय हा भारतातच स्पर्धा आयोजनाचा आहे. परंतु करोनाची साथ नियंत्रणात न आल्यास संयुक्त अरब अमिराती आणि श्रीलंकेचाही विचार करता येईल. पण स्पर्धा देशाबाहेर गेल्यास खर्चही वाढेल, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने दिली.

२०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारत उत्सुक असला तरी ‘आयसीसी’ला केंद्र सरकारकडून कर सुटीचे प्रमाणपत्र ‘बीसीसीआय’ने सादर करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हा विषयसुद्धा ‘बीसीसीआय’च्या बैठकीत महत्त्वाचा असेल.

इंग्लंड दौरा फेब्रुवारीत?

भारतीय क्रिकेटच्या सध्याच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार सप्टेंबरमध्ये होणारी इंग्लंडविरुद्धची मर्यादित षटकांची मालिका पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये कसोटी मालिकेनंतर घेता येऊ शकते. याशिवाय श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकांचीही पुनर्रचना करावी लागणार आहे.

विषयपत्रिकेतील मुद्दे

१. ‘आयपीएल’चा कृती आराखडा

२. देशांतर्गत क्रिकेट हंगाम

३. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगामाची कार्यक्रमपत्रिका

४. २०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी करसूट प्रमाणपत्र

५. बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील सुविधा

६. ‘बीसीसीआय’ आणि ‘आयपीएल’च्या डिजिटल करारांचे नूतनीकरण

७. बिहार क्रिकेट संघटनेमधील प्रशासकीय गोंधळ

८. ‘बीसीसीआय’च्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नेमणूक

९. राहुल जोहरी यांच्या राजीनाम्यानंतर नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची प्रक्रिया

१०. ईशान्येकडी राज्यांसाठीचे अनुदान

११. गणवेश करराच्या निविदांवर चर्चा

विश्वचषकाच्या निर्णयानंतर ‘आयपीएल’च्या तारखांची निश्चिती

करोनामुळे ‘आयपीएल’ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या पूर्वार्धापर्यंत लीग घेता येऊ शकते, अशी ‘बीसीसीआय’ला आशा आहे. ‘‘करोनाच्या सद्यस्थितीत आम्ही स्पर्धेचे स्थळ निश्चित करण्याची शक्यता कमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेबाबत निर्णय घेतल्यानंतर आम्ही तारखा ठरवू शकू. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणारी ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता असून, पुढील आठवडय़ात याबाबत औपचारिक निर्णय जाहीर होऊ शकेल,’’ अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिली. पुढील सोमवारी ‘आयसीसी’च्या कार्यकारिणी समितीची बैठक आहे.

देशांतर्गत क्रिकेट हंगामाला कात्री

स्थानिक क्रिकेट हंगाची रचनात्मक मांडणी करणे ‘बीसीसीआय’साठी सर्वात आव्हानात्मक ठरणार आहे. पुरुषांसाठी वरिष्ठ गट, २३-वर्षांखालील गट, कनिष्ठ गट (१९ आणि १६ वर्षांखालील) तसेच महिलांसाठी वरिष्ठ, २३, १९ वर्षांखालील गट अशा विविध गटांच्या हजारांहून अधिक सामन्यांचे नियोजन करावे लागणार आहे. ‘‘रणजी करंडक स्पर्धेला कात्री लावावी लागणार आहे. याचप्रमाणे विजय हजारे, दुलीप करंडक आणि सय्यद मुश्ताक अली या स्पर्धाबाबतही चर्चा होईल. त्यामुळे यापैकी एखादी स्पर्धा रद्दसुद्धा होऊ शकेल,’’ अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.