‘बीसीसीआय’ची २९ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) २९ मे रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत आगामी देशांतर्गत क्रिकेट हंगामासह ‘आयपीएल’ आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेबाबत चर्चा होणार आहे.

भारतामधील करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर पुढील क्रिकेट हंगामाची रूपरेषा ठरवणे, हा विशेष सर्वसाधारण सभेचा मुख्य उद्देश आहे, असे ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णसंख्या कमालीची वाढल्यामुळे भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापुढे साशंकता निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) बैठक १ जूनला होणार असून, या बैठकीत ट्वेन्टी-२० विश्वचषकाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

करोनामुळे जैव-सुरक्षित परिघाचा भंग झाल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचा १४वा हंगाम अर्धवट स्थगित करण्यात आला. या पाश्र्वभूमीवर ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संयुक्त अरब अमिरातीचा पर्याय समोर येत आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत ‘बीसीसीआय’ने ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी अहमदाबाद, बेंगळूरु, चेन्नई, दिल्ली, धरमशाला, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि मुंबई ही नऊ ठिकाणे निश्चित केली.