इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी खेळपट्टीवर मूत्रविसर्जन करीत असभ्यतेचे वर्तन केले आहे व आपला मूर्खपणा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे, असे ऑस्ट्रेलियाचे ज्येष्ठ क्रिकेटपटू शेन वॉर्न यांनी म्हटले आहे.
ओव्हल येथे पाचवी कसोटी संपल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी केलेल्या बेशिस्त वर्तनाचे प्रत्यक्ष वर्णन अनेक ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. क्रिकेट क्षेत्रात अशी घटना क्वचितच घडली आहे. सरे कौंटीचे मुख्य कार्यकारी रीचर्ड गौल्ड यांनी या संदर्भात इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाकडे संपर्क साधला आहे.
वॉर्न यांनी आजपर्यंत इंग्लंडच्या खेळाडूंवर अनेक वेळा तोंडसुख घेतले आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी केलेल्या बेशिस्त वर्तनामुळे त्यांना आयतेच खाद्य मिळाले आहे. ते म्हणाले, ‘‘सहसा कोणत्याही विजयाबद्दलची मेजवानी ही फक्त ड्रेसिंग रूमपुरतीच मर्यादित असते. तेथे तुम्हास जल्लोष करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. मात्र ओव्हल येथे इंग्लंडच्या खेळाडूंनी उन्मत्तपणाचा प्रत्यय घडविला आहे. खरंतर असा बेशिस्तपणा इंग्लंडच्या खेळाडूंकडून अपेक्षित नव्हता. त्यांच्या मूर्खपणाचा हा कळस गाठला गेला आहे. गेल्या दोन कसोटींमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंच्या वर्तनात खूप बदल घडले आहेत. विशेषत: मैदानाबाहेर त्यांचे जे काही वर्तन घडले आहे, त्यामुळे मी अतिशय थक्क झालो आहे.’’
‘‘मालिका जिंकल्यानंतर इंग्लंडचे खेळाडू खूप भावनिक होतील व खूप आनंदित होतील अशी मला अपेक्षा होती. त्यांनी आपल्या मित्र व नातेवाईकांसमवेत हा आनंद साजरा केला असेल अशी मला आशा होती. प्रत्यक्षात त्यांचे वर्तन क्रिकेटला काळिमा फासणारे आहे,’’ असे वॉर्न यांनी सांगितले.
इंग्लंडचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ग्रॅहॅम स्वान याने येथील एका वृत्तपत्रातील स्तंभात याबाबत खुलासा दिला आहे. त्याने म्हटले की, ‘‘आम्ही खेळपट्टीवर गेलो होतो. तेथे आम्ही गाणी म्हटली, जल्लोष केला. मूत्रविसर्जन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती टाळणे अशक्य आहे. आम्ही खेळपट्टीवर होतो त्यावेळी अंधार होता.’’
इंग्लंडचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मॉन्टी पानेसरला ५ ऑगस्ट रोजी एका नाइट क्लबच्या बाहेर लघुशंका केल्याबद्दल दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे.