मुंबई : श्री सिद्धेश्वर सेवा मंडळाने आयोजित केलेल्या कुमार गट जिल्हास्तरीय मनसे चषक स्पर्धेचे विजेतेपद विजय क्लबने पटकावले. प्रभादेवी येथील राजाराम साळवी क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात दादरच्या विजय क्लबने प्रभादेवीच्या सिद्धीप्रभा फाऊंडेशनचा ४८-०९ असा दणदणीत पराभव केला. सुधीर सिंगच्या चढाया, त्याला अभिषेक रुपनारची मिळालेली चढाईची तसेच उजवा मध्यरक्षक शुभम वर्मा आणि डावा मध्यरक्षक रोशन भूतिया यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे विजय क्लबला हा मोठा विजय मिळवता आला.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार विजय क्लबच्या सुधीर सिंगने पटकावला. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा खेळाडू सिद्धिप्रभाचा विवेक मोरे आणि उत्कृष्ट पकडीचा खेळाडू विजय क्लबचा रोशन भूतिया ठरला. विकास मंडळाचा अवधूत शिंदे स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू ठरला.