News Flash

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा : दिवाकर प्रसादला पराभवाचा धक्का

विजेंदर सिंग, शिवा थापा, अखिल कुमार यांसारख्या अनेक स्टार बॉक्सर्सच्या अनुपस्थितीत रंगलेल्या आणि बॉक्सिंग इंडियाच्या विद्यमाने आयोजित

| January 13, 2015 12:17 pm

विजेंदर सिंग, शिवा थापा, अखिल कुमार यांसारख्या अनेक स्टार बॉक्सर्सच्या अनुपस्थितीत रंगलेल्या आणि बॉक्सिंग इंडियाच्या विद्यमाने आयोजित पहिल्यावहिल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत ऑलिम्पियन दिवाकर प्रसादला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. लंडन ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या सुमीत संगवानने बलाढय़ प्रतिस्पध्र्यासमोर अनुभव पणाला लावत बाजी मारली. राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या रेल्वेच्या अमनदीप सिंगने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत उपांत्य फेरी गाठली.
भारतीय बॉक्सिंगवर असलेल्या ऑलिम्पिक बंदीमुळे गेली दोन वर्षे देशातील बॉक्सिंग स्पर्धाना ‘ब्रेक’ लागला होता. पण नवी संघटना म्हणून उदयास आलेल्या बॉक्सिंग इंडियाने नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या पुरुषांच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने अनेक थरारक लढतींचा आस्वाद नागपूरकरांना घेता आला. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दिवाकर प्रसादला भारताचा स्टार बॉक्सर शिवा थापाचा मोठा भाऊ गोविंदने हरवले. गोविंदचा सरळ पंच थेट हनुवटीवर बसल्यामुळे दिवाकरच्या चेहऱ्यातून रक्त येऊ लागले. त्यामुळे पंचांनी लढत थांबवून गोविंदला विजयी घोषित केले.
हरयाणाच्या सुमीत संगवानसमोर रेल्वेच्या कुलदीप सिंगचे तगडे आव्हान होते. पण सुमीतने योग्य दिशेने आत्मविश्वासाने पंचेस लगावत उपांत्यपूर्व फेरीची लढत २-१ अशी जिंकली.
अमनदीप सिंगने ५२ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंडच्या कविंदर सिंगचा २-१ असा पराभव केला.

महाराष्ट्राच्या मृणाल भोसलेची आगेकूच
महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पुण्याच्या अक्षय मानकरला बँटमवेट गटात (५२ किलो) हरयाणाच्या सुनीलकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला तरी मृणाल भोसलेने ६४ किलो वजनी गटात उत्तर प्रदेशच्या आकाश कुमारला धूळ चारत उपांत्य फेरी गाठली. वर्ल्ड सीरिज ऑफ बॉक्सिंग ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक स्पर्धा गाजविणाऱ्या सिद्धार्थ वर्माने उपांत्यपूर्व फेरीत आंध्र प्रदेशच्या के. हरीशला पहिल्याच फेरीत माघार घेण्यास भाग पाडले. सध्या दादरा नगर हवेलीचे प्रतिनित्वि करणाऱ्या पुण्याच्या सिद्धार्थने आक्रमक खेळ करत हरीशला जोरदार ठोसे लगावले. सिद्धार्थसमोर आपला निभाव लागणार नाही, हे लक्षात येताच हरीशने काढता पाय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 12:17 pm

Web Title: diwakar prasad suffers shock defeat in national boxing championships
टॅग : Boxing
Next Stories
1 सर्वोत्तमाच्या ध्यासाने मला प्रेरणा -पेस
2 महाराष्ट्राच्या रणरागिणी अजिंक्य
3 गोलंदाज निवडताना दृष्टिकोन बदलायला हवा -कुंबळे
Just Now!
X