‘आयएएएफ’ मधील भ्रष्टाचार प्रकरण

भ्रष्टाचार प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटना महासंघाचे (आयएएएफ) मानद सभासद लॅमिनी दियाक यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दियाक यांनी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
दियाक यांचा राजीनामा आपल्या कार्यालयाकडे आला आहे, असे आयएएएफने एका पत्रकाद्वारे नमूद करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आयएएएफचे अध्यक्ष प्रिन्स अल्बर्ट यांच्याकडे देण्यात आली आहे. आयएएफच्या कार्यकारिणीची लवकरच बैठक होईल व त्यामध्ये नवीन अध्यक्ष नियुक्त केला जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर अ‍ॅथलेटिक्सचा प्रसार व्हावा यासाठी १९८६ मध्ये आयएएएफचे तत्कालीन अध्यक्ष प्रिमो नेबिओलो यांनी आयएएफची स्थापना केली होती. १९९९ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर दियाक यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम धावपटू व अन्य पुरस्कार देण्याचे काम आयएएफकडे सोपविण्यात आले होते. यंदाचाही पुरस्कार वितरण कार्यक्रम आखण्यात आला होता, मात्र दियाक यांच्यावर फ्रेंच पोलिसांनी लाच व भ्रष्टाचाराचे आरोप ठेवल्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.