ऑस्ट्रेलिया खुल्या स्पध्रेची पूर्वतयारी

टेनिसविश्वातील गतहंगाम गाजवणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिच नव्या वर्षांत विजयाध्याय लिहिण्यासाठी सज्ज झाला आहे. कतार खुल्या स्पध्रेतून जोकोव्हिच २०१६च्या हंगामाचा श्रीगणेशा करणार आहे. या स्पध्रेत सहभाग घेऊन जोकोव्हिच ऑस्ट्रेलिया खुल्या स्पध्रेची पूर्वतयारी करणार आहे. ऑस्ट्रेलिया, विम्बल्डन आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेचा गतविजेता जोकोव्हिच या स्पध्रेत राफेल नदाल, थॉमस बर्डिच आणि डेव्हिड फेरर या तगडय़ा प्रतिस्पर्धीसोबत मुकाबला करेल.

या पहिल्याच स्पध्रेत दमदार खेळ करून गतवर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य जोकोव्हिचसमोर असेल. २८ वर्षीय खेळाडूने गतवर्षी पुरुष एकेरीत अधिराज्य गाजवले. तीन ग्रँड स्लॅम जेतेपद, सलग १५ स्पर्धाच्या अंतिम फेरीत प्रवेश आणि २१ कोटी डॉलरहून अधिक बक्षीस रक्कम जोकोव्हिचने गत हंगामात जिंकली. चारही ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा विक्रमही जोकोव्हिचने २०१५ मध्ये केला. रॉजर फेडरर आणि रॉड लॅव्हेर यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला.   १९६९ नंतर लॅव्हेर यांच्यानंतर एका हंगामात चारही ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम जोकोव्हिच करू शकतो, अशी चर्चा टेनिस क्षेत्रात आहे. यापलीकडे रिओ ऑलिम्पिकही याच वर्षी होत असल्याने जोकोव्हिचला पदकांमध्ये भर घालण्याची संधी चालून आली आहे.

नदालची परीक्षा

मावळलेल्या वर्षांत निराशाजनक कामगिरीमुळे हताश झालेल्या राफेल नदालसाठी कतार खुली स्पर्धा म्हणजे सत्त्वपरीक्षाच आहे. या स्पध्रेतून नदालच्या कामगिरीचा अंदाज बांधण्यास सर्व उत्सुक आहेत. मात्र, सराव सत्रात चांगली कामगिरी केल्याचा दावा नदालने केला आहे. या स्पध्रेत नदालला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. गतवर्षी त्याला पहिल्याच फेरीत जर्मनीच्या मायकेल बेरेरकडून पराभव पत्करावा लागला होता. तत्पूर्वी, २०१४ मध्ये नदालने या स्पध्रेत जेतेपद पटकावले होते.