अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

जागतिक टेनिस क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला नोव्हाक जोकोव्हिच आणि अनुभवी महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स यांनी गुरुवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवून अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

त्याशिवाय रॉजर फेडरर, केई निशिकोरी, अ‍ॅश्ले बर्टी आणि कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनीसुद्धा पुढील फेरीत आगेकूच केली. बुधवारची मध्यरात्र आणि गुरुवारची पहाट (भारतीय वेळेनुसार) पकडून होणाऱ्या ३२ सामन्यांपैकी एकूण १० सामने पावसामुळे पुढे ढकलण्यात आले.

पुरुष एकेरीत सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोव्हिचने खांद्याच्या दुखापतीमुळे असह्य़ वेदना होत असतानाही २ तास आणि १५ मिनिटे रंगलेल्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अर्जेटिनाच्या जुआन लोंडेरोवर ६-४, ७-६ (७-३), ६-१ असा विजय मिळवला. कारकीर्दीतील १७व्या ग्रँडस्लॅमसाठी उत्सुक असलेल्या जोकोव्हिचचा पहिल्या सेटनंतर खांदा दुखू लागला होता; परंतु त्याने वेळीच उपचार करून सामन्यातून माघार घेण्याचे टाळले. दुसरा सेट टायब्रेकपर्यंत लांबल्याने त्याला अधिक वेदना जाणवू लागल्या, मात्र त्याने तो सेटही जिंकून शुक्रवारी होणाऱ्या तिसऱ्या फेरीसाठी स्वत:चे स्थान पक्के केले.

स्वित्झर्लंडच्या तिसऱ्या मानांकित फेडररने पुन्हा एकदा संथ सुरुवात करताना बोस्नियाच्या दॅमिर झुमहूरविरुद्ध पहिला सेट ३-६ असा गमावला; परंतु उर्वरित तीन सेटमध्ये त्याने झोकात पुनरागमन करून ३-६, ६-२, ६-३, ६-४ असा चार सेटमध्ये सामना जिंकला. जपानच्या सातव्या मानांकित निशिकोरीने अमेरिकेच्या ब्रॅडली क्लॅनवर ६-२, ४-६, ६-३, ७-५ असा विजय मिळवला.

महिला एकेरीत अमेरिकेच्या आठव्या मानांकित सेरेनाविरुद्ध अमेरिकेच्याच १७ वर्षीय कॅटी मॅकनलीने पहिला सेट ७-५ असा जिंकला, परंतु सेरेनाने उर्वरित दोन सेटमध्ये पुनरागमन करून ५-७, ६-३, ६-१ असा विजय मिळवला. हा सामना १ तास आणि ५४ मिनिटे रंगला.

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या मानांकित बर्टीने अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसला ६-२, ७-६ (७-२) अशी धूळ चारली. चेक प्रजासत्ताकच्या तिसऱ्या मानांकित प्लिस्कोव्हाने मरियम बोल्कावेझवर ६-१, ६-४ असे वर्चस्व गाजवले. अमेरिकेच्या १०व्या मानांकित मॅडीसन कीजने चीनच्या झू लिनचा ६-४, ६-१ असे नमवले.

आजचा सामना माझ्या अनुभवाची कसोटी पाहणारा ठरला. जर मी पराभूत झाली असती तर काहींनी लगेच माझ्या निवृत्तीविषयक चर्चाना सुरुवात केली असती, परंतु मला माझ्या खेळावर विश्वास होता.

– सेरेना विल्यम्स