इटालियन खुली टेनिस स्पर्धा

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यातील वर्तणुकीबद्दल नोव्हाक जोकोव्हिचला पंचांनी ताकीद दिली आहे. हा सामना जोकोव्हिचने ७-५, ६-३ असा जिंकून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

रागाच्या भरात चेंडू अनवधानाने पंचांकडे भिरकावल्याप्रकरणी जोकोव्हिचची अमेरिकन टेनिस स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर इटालियन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात सव्‍‌र्हिस गमावल्यानंतर जोकोव्हिचने रॅकेट जोराने जमिनीवर आदळली. त्यामुळे त्याच्या रॅकेटचे नुकसान झाले. मग रविवारी उपांत्य सामन्यातील दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने खुर्चीवरील पंचांशी हुज्जत घातल्याचा फटका त्याला बसला.

‘‘मला दिलेली ताकीद योग्यच आहे. मी पंचांच्या निर्णयाबाबत दाद मागितली, हेच वादग्रस्त ठरले,’’ असे जोकोव्हिचने सांगितले.

हॅलेपला महिलांचे विजेतेपद; प्लिस्कोव्हाची माघार

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीतून चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे रोमानियाच्या सिमोला हॅलेपला विजेतेपद बहाल करण्यात आले. पाठीच्या दुखापतीमुळे प्लिस्कोव्हाने जेव्हा सामना सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हॅलेप ६-०, २-१ अशी आघाडीवर होती. हॅलेपचे या स्पर्धेतील पहिलेचे जेतेपद ठरले, तर २०१७, २०१८मध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.