लंडन : गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने साजेशी कामगिरी करताना तिसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या बेर्नार्ड टॉमिकचा १ तास ३२ मिनिटांच्या लढतीत ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत आगेकूच केली, तर महिला एकेरीत रशियाच्या मारिया शारापोव्हाने एक तास २३ मिनिटांत रोमानियाच्या एरिना कॅमेलिआ बेगूवर ६-४, ६-३ असा सहज विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या समांता स्तोसूरवरही पराभवाची नामुष्की ओढावली. अमेरिकेच्या कोको व्हँडेवेघेने तिच्यावर एक तासात ६-२, ६-० असा सोपा विजय मिळवला.
पुरुष एकेरीच्या इतर लढतीत फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेचे जेतेपद पटकावून मनोबल उंचावलेल्या स्वित्र्झलडच्या स्टॅनिसलास वॉवरिंकानेही चौथ्या फेरीत प्रवेश केला. त्याने स्पेनच्या फेर्नाडो वेर्डास्कोवर ६-४, ६-३, ६-४ असा १ तास ५४ मिनिटांत विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने ०-१ अशा पिछाडीवरून कॅनडाच्या मिलॉस राओनिकचा ५-७, ७-५, ७-६ (७-३), ६-३ असा पराभव केला. ही लढत दोन तास ४३ मिनिटे चालली. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्ह याला पराभवाचा धक्का बसला. फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्कुएटने त्याच्यावर ६-३, ६-४, ६-४ असा विजय मिळवला.