ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीच अव्वल मानांकित स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यातील लढतीचा आनंद टेनिसप्रेमींना घेता आला. निमित्त होते एटीपी चषक टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीचे. या सांघिक स्पर्धेत जोकोविचच्या सर्बियाने राफेल नदालच्या स्पेनला पराभूत केले. याबरोबरच पहिल्यावहिल्या एटीपी टेनिस स्पर्धेवर जोकोविचच्या सर्बियाने नाव कोरले.

अंतिम लढतीत स्पेनच्या रॉबटरे बॉटिस्टा अगुतने सर्बियाच्या डुनास लॅजोविचचा ७-५, ६-१ पराभव केला होता. मात्र लक्षवेधी लढतीत जोकोव्हिचने नदालला ६-२, ७-६ असे नमवले. त्यापाठोपाठ दुहेरीची लढत महत्वपूर्ण ठरणार होती. मात्र त्या लढतीतून थकवा आल्याच्या कारणास्तव नदालने माघार घेतली. मात्र जोकोव्हिचने व्हिक्टर ट्रोइकीच्यासाथीने दुहेरीत खेळत सर्बियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

यंदा जोकोव्हिच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आठव्यांदा जेतेपद पटकवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर १९ ग्रॅँडस्लॅम विजेता नदाल हा स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या विक्रमी २० ग्रॅँडस्लॅम जेतेपदांशी बरोबरी करण्यासाठी उत्सुक आहे.