पावसाचा व्यत्यय आल्याने मध्यावर थांबवण्यात आलेला भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यानचा उपांत्य फेरीतील सामना दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरु झाला. काल जेथे सामना संपला तेथून खेळताना न्यूझीलंडच्या संघाला डावातील उर्वरीत ३.५ षटकांमध्ये २८ धावा जोडता आल्या आणि त्यांचा डाव २३९ धावांवर संपला. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच धक्कादायक झाली अवघ्या पाच धावांमध्ये भारताचे पहिले तीन फलंदाज तंबूत परले. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल हे तिघेही प्रत्येकी एक धाव करुन तंबूत परतले. भारताच्या फलंदाजीचा कणा असणाऱ्या सलामीवीर अगदीच स्वस्तात मागे परतल्याने भारतीय संघावर पराभवाचे सावट आहे. त्यातच या सामन्यात पाऊस पडल्यास भारताच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

भारताचे चार गडी बाद झाले असल्याने पाऊस पडल्यास ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ नियमानुसार भारतासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ नियमानुसार सामन्याचा निकाल लावण्यासाठी दोन्ही संघांनी कमीत कमी २० षटके फलंदाजी करणे गरजचे असते. त्यामुळेच आता पाऊस पडल्यानंतरही भारताला ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ प्रकाराने हा सामना जिंकायचा असला तर २० षटकांमध्ये ११० धावा करणे गरजेचे आहे.

पाच गडी बाद झाल्यास भारताला २० षटकांमध्ये १३४, सहा गडी बाद झाल्यास १६१, सात गडी बाद झाल्यास १८७ आणि आठ गडी बाद झाल्यास २१० धावा करणे गरजेचे आहे.

मात्र सध्याची परिस्थिती पाहता ‘डकवर्थ-लुइस-स्टर्न’ नियामनुसार गरजेची धावसंख्या गाठणे भारतासाठी कठीण जाणार आहे.