इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर व्यथित झालेला न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशामला विश्वचषक गमावल्याचे अतीव दु:ख झाले आहे. ‘‘मुलांनो, काहीही करा, पण क्रिकेटकडे वळू नका,’’ अशी उद्विग्न प्रतिक्रिया नीशामने व्यक्त केली आहे.

‘‘मुलांनो कोणत्याही क्षेत्राकडे वळा. बेकरी क्षेत्राकडे किंवा अन्य कोणतेही काम करा. आनंदात आयुष्य घालवून ६०व्या वर्षी मरा. पण क्रिकेटकडे वळू नका,’’ असे नीशामने सांगितले.

विश्वचषक गमावल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी हे दु:ख काहीसे पचवले असले तरी नीशामला मात्र या वेदना असह्य़ होत आहेत. तो म्हणतो, ‘‘मी प्रचंड निराश झालो आहे. पुढील किमान दशकभर तरी मी या अध्र्या तासाच्या खेळाचा विचारही करू शकणार नाही. मात्र विश्वविजेत्या इंग्लंड संघाला माझ्या शुभेच्छा. अंतिम सामन्यासाठी चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लंडनमध्ये हजेरी लावली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ’’