माजी खेळाडूंची मागणी
हॉकी इंडिया लीगमधील पाकिस्तानी खेळाडूंना परत पाठवल्याच्या निर्णयाचे भारताच्या माजी हॉकीपटूंनी स्वागत केले असून सध्याच्या वादाच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनाही भारतात खेळू देऊ नका, असे सुचवले आहे.
भारताच्या दोन जवानांचा शिरच्छेद केल्यानंतर देशभर संतापाची लाट पसरली असताना हॉकी इंडिया लीगमध्ये सहभागी होणाऱ्या नऊ पाकिस्तानी खेळाडूंना मंगळवारी परत पाठवण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला. याबाबत १९७५मध्ये जागतिक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघातील सदस्य अशोक कुमार म्हणाले, ‘‘खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ करू नये, पण सध्या पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. खेळाडू हेसुद्धा आपापल्या देशाचे नागरिक असतात. पाकिस्तानने सर्व मर्यादा ओलांडल्यामुळे त्यांच्या कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्याची आमची इच्छा नाही, हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवा.’’
माजी ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेते हॉकीपटू मुकेश कुमार म्हणतात, ‘‘भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान समालोचन करणाऱ्या रमिझ राजा आणि वासिम अक्रम या दोन खेळाडूंनाही पाकिस्तानात पाठवायला हवे.
पाकिस्तानी हॉकीपटूंना परत पाठवण्याचा योग्य निर्णय हॉकी इंडियाने घेतला.’’