सातत्यपूर्ण कामगिरी आणि घरच्या मैदानाचा मिळणारा फायदा यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असला तरी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सहकाऱ्यांना सूचक सल्ला दिला आहे. परिस्थिती आपल्या बाजूने असली तरी इतरांना गृहीत धरणे संघासाठी घातक ठरेल, असे मत धोनीने व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत नमवल्यानंतर श्रीलंकेवर मायदेशात विजय मिळविणाऱ्या भारतीय संघाने आशिया ट्वेन्टी-२० चषक स्पध्रेचे जेतेपद पटकावले. या तीन मालिकेत भारताने केवळ एकच सामन्यात पराभव पत्करला. त्यामुळे २००७च्या विश्वचषक स्पध्रेनंतर पुन्हा ट्वेन्टी-२० जेतेपदाचा मान पटकावण्याच्या दिशेने भारताने मजबूत संघबांधणी केली आहे. भारताचा पहिला सामना १५ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

‘‘संघ सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आहे. तांत्रिकदृष्टय़ा आमची बाजू वरचढ आहे, परंतु कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही मैदानावर कसून सराव करीत आहोत. पहिल्या चेंडूपासून सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. संघाच्या यशाचा मला आनंद आहे,’’ असे धोनी म्हणाला.