भारतात जात आणि धर्मावरुन वातावरण कधी बिघडेल याची खात्री कधीही देता येत नाही. हिंदू-मुस्लिम वाद हा भारताला आता काही नवीन राहिलेला नाही. मात्र खेळ हा एकमेव घटक असा आहे की जिथे सर्व जाती-धर्म आणि पंथाचे लोक एकत्र येऊन खेळतात. खेळाच्या मैदानात धर्म आणि जात या संकल्पना गळून फक्त भारतीय ही भावना निर्माण होते. मात्र सध्या सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघात मुस्लिम खेळाडूंच्या निवडीवरुन गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी प्रश्न विचारुन एका नवीन वादाला तोंड फोडलं.

सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटमध्ये किती मुस्लिम खेळाडू आहेत? निवड समितीचे सदस्य संघाची निवड करताना नेमके कोणते निकष लावतात, असा प्रश्न विचारुन संजीव भट यांनी निवड समिती आणि बीसीसीआयच्या संघ निवडीच्या निकषांवर बोट ठेवलं.

मात्र ही टीका करताना सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंड आणि आगामी श्रीलंकेविरुद्धच्या संघात निवड झालेल्या मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना संजीव भट सोयीस्करररित्या विसरले. भारतीय संघात मुस्लिम खेळाडूंचं योगदान हे मोठं आहे. ९० च्या दशकापासून मोहम्मद अझरुद्दीन सारख्या खेळाडूने भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं आहे. याव्यतिरीक्त मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, परवेज रसूल, इरफान-युसूफ पठाण, जहीर खान, मोहम्मद कैफ, मुनाफ पटेल यांनी भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं आहे. याव्यतिरिक्त भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेटमध्येही अनेक मुस्लिम खेळाडू आपलं योगदान देत आहेत. वसीम जाफर, अरमान जाफर, सरफराज खान, सुफीयान शेख यासारखे उदयोनमुख खेळाडू आपलं कौशल्य दाखवत आहेत.

संजीव भट यांच्या या टीकेला सध्या संघाबाहेर असलेला फिरकीपटू हरभजन सिंहनेही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

याव्यतिरीक्त फेसबुकवरही संजीव भट यांच्या अकाऊंटवर नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.