यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारचे परखड मत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रो कबड्डी लीग गेल्या दोन वर्षांत कमालीची लोकप्रिय झाली आहे, परंतु तरीही वर्षांतून दोनदा ती खेळवण्याची आवश्यकता मुळीच नव्हती, असे परखड मत गतविजेत्या यू मुंबा संघाचा कर्णधार अनुप कुमारने व्यक्त केले आहे.

भारताचा कर्णधार राकेश कुमार प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामापासून यू मुंबा संघातून खेळणार असल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. त्या वेळी अनुप कुमार म्हणाला, ‘‘प्रो कबड्डीचे वर्षांतून दोन हंगाम होत आहेत, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण एखादी गोष्ट टीव्हीवर सातत्याने दाखवली गेली, तर लोक कंटाळण्याची भीती आहे. वर्षांतून एकदा स्पर्धा झाली तर क्रीडारसिक त्याची आतुरतेने वाट पाहतील, असे माझे वैयक्तिक मत आहे. आम्हीसुद्धा जोशात आक्रमक खेळाचे प्रदर्शन करू शकू.’’

‘‘दुखापती कबड्डी खेळात निरंतर होत असतात. वर्षभरात राष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, व्यावसायिक स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धा, शिबिरे, आदी गोष्टींमध्ये कबड्डीपटू व्यग्र असतो. त्यात प्रो कबड्डीच्या दोन हंगामांची भर पडल्यास आम्हाला एकीकडे दुखापतींचे आव्हान असेल आणि वैयक्तिक जीवनासाठी वेळच मिळणार नाही,’’ अशा भावना अनुपने या वेळी व्यक्त केल्या.

राकेश कुमारनेही अनुपचे समर्थन करताना म्हटले की, ‘‘तिसऱ्या हंगामाला चांगला प्रतिसाद मिळाला, तरच वर्षांतून दोनदा लीग घेण्यात फायदा आहे. वर्षांतून दोनदा स्पर्धा झाल्यास त्याचा फरक पडणे स्वाभाविक आहे. कबड्डी हा धसमुसळा खेळ असल्यामुळे दुखापती होण्याची शक्यता असते.’’

तो पुढे म्हणाला, ‘‘दुसरा हंगाम माझ्यासाठी खराब ठरला होता. दुखापतीमुळे मला पुरेसे सामने खेळता आले नव्हते. परंतु यंदा प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामातील विजेत्या यू मुंबा संघात सामील होणे, ही माझ्यासाठी अत्यंत सुखद गोष्ट आहे. मी आणि अनुप खूप चांगले मित्र असल्यामुळे यू मुंबाकडून खेळण्याचे मी आधीच निश्चित केले होते.’’

‘‘यू मुंबा हा संघ आधीपासूनच भक्कम होता. राकेशच्या येण्याने आमची सांघिक ताकद आणखी वाढली. तिसऱ्या हंगामातील सांघिक बलाबल अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा अंदाज आल्यावर योग्य रणनीती आखली जाईल,’’ असे अनुपने सांगितले. दोन वर्षांपूर्वी प्रो कबड्डीच्या लिलावात सर्वाधिक बोली जिंकत राकेशने पाटणा पायरेट्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

प्रो कबड्डीचा तिसरा हंगाम ३० जानेवारी ते ५ मार्च २०१६ या कालावधीत रंगणार आहे. हैदराबादमध्ये यू मुंबाचा तेलुगू टायटन्सविरुद्ध सलामीचा सामना रंगणार आहे. सध्या यू मुंबाचे १२ ते ३० डिसेंबर या कालावधीत केरळमध्ये तंदुरुस्त शिबीर चालू आहे. त्यानंतर जानेवारीत मुंबई विशेष सराव शिबीर होणार आहे. मात्र राकेश आणि अनुप दोघेही २१ डिसेंबर ते ६ जानेवारीपर्यंत बंगळुरूला होणाऱ्या भारतीय संघाच्या कबड्डी शिबिराला जाणार आहेत.

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not set a two season of pro kabaddi league in one year anup kumar
First published on: 21-12-2015 at 00:59 IST