कोलकाता : गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या प्रकाशझोतातील कसोटीविषयी सर्वाना उत्सुकता असली तरी, याकडे मनोरंजन म्हणून पाहून सामन्याची मूळ मजा घालवू नये, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली. त्याचप्रमाणे प्रकाशझोतातील सामन्यांचे क्वचितच आयोजन करून सूर्यप्रकाशात रंगणाऱ्या कसोटीचे महत्त्व कमी करू नये, अशी सूचना कोहलीने केली.

कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगणाऱ्या भारत-बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने गुलाबी चेंडूच्या भविष्याविषयी त्याचे मत मांडतानाच पारंपरिक कसोटीचे गांभीर्य अधोरेखित केले.

‘‘प्रकाशझोतातील कसोटी सामन्याची संकल्पना निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु या सामन्याकडे मनोरंजन म्हणून पाहू नये. तसेच सातत्याने प्रकाशझोतातील सामन्यांचे आयोजन करणेही कसोटीच्या मूळ प्रकारासाठी धोकादायक ठरेल. सूर्यप्रकाशात सकाळच्या सत्रात फलंदाजी अथवा गोलंदाजी करण्यात खेळाडूंचा कस लागतो, त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होता कामा नये,’’ असे कोहली म्हणाला. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतसुद्धा प्रकाशझोतातील सामन्याचे आयोजन केल्यास ‘बीसीसीआय’ने त्यापूर्वी सराव सामना नक्की खेळवावा, असेही कोहलीने सांगितले.