24 November 2017

News Flash

करो या मरो मुकाबला

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी इंग्लंड आणि न्यूझीलंडला सुपर सिक्सच्या

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 13, 2013 4:56 AM

* इंग्लंड आणि न्यूझीलंडला विजय आवश्यक
* वेस्ट इंडिज-ऑस्ट्रेलिया लढतीवर दोन्ही संघाचे लक्ष
महिला विश्वचषक  क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी इंग्लंड आणि न्यूझीलंडला सुपर सिक्सच्या करो या मरो लढतीत आमनेसामने आहेत. मात्र अन्य लढतीत वेस्ट इंडिजने भन्नाट फॉर्मात असलेल्या ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखल्यास इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते.
२००९मध्ये विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारणारा न्यूझीलंडचा संघ इंग्लंडसह चार गुणांवर आहे. या दोघांपैकी जो संघ जिंकेल, तो अव्वल धावगतीच्या आधारावर अंतिम फेरीत धडक मारणार आहे. मात्र याकरता ऑस्ट्रेलियाने विजयी परंपरा कायम राखणे आवश्यक आहे.
जेतेपद राखण्यासाठी इंग्लंडचा संघ आतुर आहे. सुपर सिक्सच्या पहिल्या लढतीत इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाने २ धावांनी निसटता पराभव केला होता. त्यानंतर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत दमदार विजय मिळवला होता. दुसरीकडे न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धची लढत गमावल्याने अंतिम फेरीत कोणता संघ जाणार हा मुकाबला चुरशीचा झाला आहे.
इंग्लडची कर्णधार शालरेट एडवर्ड्स चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र तिला अन्य फलंदाजांकडून साथ मिळणे आवश्यक आहे. गोलंदाजीत इंग्लंडचा संघ मजबूत आहे. कॅथरिन ब्रन्ट आणि अन्या श्रुसबोले ही जोडी प्रतिस्पर्धी संघांकरता डोकेदुखी ठरली आहे. अष्टपैलू आरन ब्रिंडलही संघाच्या विजयात निर्णायक ठरू शकते.
न्यूझीलंडसाठी सूजी बेट्सचा फॉर्म महत्त्वाचा आहे. अन्य फलंदाजांना मोठी खेळी करण्यात आलेले अपयश संघव्यवस्थापनाची चिंता वाढवणारे आहे. दुसरीकडे सियान रक, रचेल कँडी आणि लिआ ताहिहू हे गोलंदाजी त्रिकूट लौकिलाला साजेशी कामगिरी करत आहेत.
मात्र सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाचे लक्ष ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज लढतीकडे असणार आहे.
साखळी गटात एकमेव लढत जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजने सुपर सिक्स गटात न्यूझीलंडला नमवले. अंतिम फेरीत स्थान पक्के करायचे असल्यास त्यांना ऑस्ट्रेलियाचा अडथळा पार करावा लागणार आहे. डेंट्रा डॉटिन आणि स्टेफनी टेलर या द्वयीवर फलंदाजांची भिस्त आहे. गोलंदाजीमध्ये त्रिमयने स्मार्टने न्यूझीलंडविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती. या कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास वेस्ट इंडिज चमत्कार घडवू शकते. स्मार्टच्या बरोबरीने अनिसा मोहम्मदची फिरकी ऑस्ट्रेलियासाठी त्रासदायक ठरू शकते.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ अपराजित कामगिरीसह अंतिम फेरीत धडक मारण्यास उत्सुक आहे. दुखापतीतून सावरत एलियास पेरी पुनरागमन करण्याची शक्यता आहे. लिसा स्थळेकर या अनुभवी खेळाडूकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. फलंदाजीत सातत्याचा अभाव आहे.
मेग लॅनिंगवगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आलेली नाही. हा कच्चा दुवा सुधारण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.  

First Published on February 13, 2013 4:56 am

Web Title: do or die match