कौशल्याला सातत्याची जोड देण्याचे महत्त्वूपर्ण आव्हान त्रिनिदाद एण्ड टोबॅगो समोर असणार आहे. ब गटात चेन्नई सुपर किंग्सने याआधीच उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दुसऱ्या स्थानासाठी टायटन्स आणि त्रिनिदाद एण्ड टोबॅगो यांच्यात चुरस आहे. उपांत्य फेरीत प्रवेशासाठी त्रिनिदादला बलाढय़ चेन्नईला नमवावे लागणार आहे. लेंडल सिमन्स, अ‍ॅड्रियन बराथ आणि डॅरेन ब्राव्हो या युवा त्रिकुटावर त्रिनिदादच्या फलंदाजीची भिस्त आहे. सुनील नरिन त्रिनिदादसाठी हुकमी एक्का ठरू शकतो. रवी रामपॉल, सॅम्युअल बद्री, श्ॉनोन गॅब्रिएल हे गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहेत. प्रमुख खेळाडू आयपीएल संघांसाठी खेळत असल्याने त्रिनिदादची ताकद कमी झाली आहे मात्र युवा खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनाच्या आधारे उपांत्य फेरी गाठण्यासाठी हा संघ आतुर आहे. दुसरीकडे उपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण सामन्याआधी चेन्नईचा संघ काही प्रयोग करू शकतो.
सुरेश रैना, माइक हसी आणि महेंद्र सिंग धोनी जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन हे फिरकीपटू चांगली कामगिरी करत आहेत. मात्र मोहित शर्मा, जेसन होल्डर, अल्बी मॉर्केल यांना धावा रोखण्यात अपयश आले आहे. मॉर्केलच्या जागी ख्रिस मॉरिसला संधी मिळू शकते. मुरली विजयचा खराब फॉर्म वृद्धिमान साहाला संधी मिळवून देऊ शकतो.

मुंबई इंडियन्ससमोर पर्थचे आव्हान
संघात मातब्बर खेळाडूंचा भरणा असूनही मुंबई इंडियन्सला चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ‘ब’ गटातून राजस्थान रॉयल्सने उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. दुसऱ्या स्थानासाठी चुरस असल्याने पर्थविरुद्धचा मुकाबला मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’ असणार आहे. उपांत्य फेरीच्या स्थानासाठी ओटॅगो संघही शर्यतीत असल्याने मुंबईला चांगल्या धावगतीसह पर्थविरुद्धचा सामना जिंकावा लागणार आहे. दुसरीकडे पर्थ स्क्रॉचर्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या लढतीत विजय मिळवीत शेवट गोड करण्याचा पर्थचा प्रयत्न असेल. रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड यांच्यावर मुंबईच्या फलंदाजाची भिस्त आहे. सचिन तेंडुलकरला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. दिनेश कार्तिक, अंबाती रायुडूचा खराब फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे. मलिंगाच्या अनुपस्थितीत मुंबईचे आक्रमण कमकुवत झाले आहे. अनुभवी हरभजन सिंगला आपला खेळ उंचवावा लागणार आहे. मिचेल जॉन्सन आणि नॅथन कोल्टियर निले या ऑस्ट्रेलियाच्या जोडगोळीकडून मुंबईला अपेक्षा आहे. ड्वेन स्मिथचा अष्टपैलू खेळ उपयुक्त ठरू शकतो.
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेटवर.  २वेळ : दुपारी ४ वाजता.