स्कीइंग करताना झालेल्या अपघातात खडकावर डोके आदळून फॉम्र्युला-वनचा अनभिषिक्त सम्राट मायकेल शूमाकर कोमात गेला होता. या घटनेला एक महिना पूर्ण होत नाही, तोच शूमाकरला कोमातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना हळूहळू यश मिळू लागले आहे. तब्बल एका महिन्याच्या कालावधीनंतर शूमाकरला जाग येऊ लागली आहे.
शूमाकरला देण्यात येणाऱ्या उत्तेजकांची मात्रा कमी करण्यात आली आहे. शूमाकरला जाग येण्यासाठी बराच काळ लोटला. पण तो जागा होण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर त्याच्या औषधाची मात्रा लगेच कमी करण्यात आली. शूमाकरच्या कुटुंबियांची सुरक्षितता लक्षात घेऊन तसेच संबंधित व्यक्तींशी चर्चा करून त्याच्या जागे होण्याच्या प्रक्रियेला बळकटी मिळाल्यानंतरच आम्ही ती जगजाहीर केली, असे शूमाकरची व्यवस्थापक सबीन केहम हिने सांगितले.
शूमाकरवर उपचार करणारे डॉक्टर्स आणि त्याच्या कुटुंबियांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्रास देऊ नये, असे आवाहनही केहम हिने केले. ‘‘यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला मिळणार नाही,’’ असे केहम यांनी स्पष्ट केले. शूमाकरला शुद्ध आल्यानंतर कोणते उपचार केले जातील, हे मात्र समजू शकले नाही. तीन आठवडय़ांपेक्षा जास्त काळ कोमात असलेल्या रुग्णांना बाहेर काढणे कठीण असते तसेच अशा प्रकारच्या आजारातून बाहेर येणाऱ्या रुग्णांना अपंगत्वाला सामोरे जावे लागते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.