कोपनहेगन : युरो चषकातील फिनलंडविरुद्धच्या सामन्यात बेशुद्धावस्थेत मैदानावर कोसळल्यानंतर ख्रिस्तियन एरिक्सनचे प्राण वाचवण्याचे आव्हान डॉक्टरांसमोर होते. एरिक्सनची नाडीपरीक्षा केल्यानंतर आपल्याकडे फार कमी वेळ आहे, हे डेन्मार्क संघाचे डॉक्टर मॉर्टेन बोएसेन यांच्या ध्यानात आले. ‘‘सुरुवातीला तो श्वास घेत होता, त्यामुळे त्याची नाडी तपासता आली, पण नंतर त्याची प्रकृती ढासळत गेली. संघातील प्रत्येक खेळाडूला संकटाची चाहूल लागल्यानंतर आम्ही त्याच्या छातीवर दाब देण्यास सुरुवात केली,’’ असे बोएसेन म्हणाले.

पुढची १० मिनिटे सर्वासाठी भीतीदायक होती. एरिक्सनवर विविध उपचार करण्यात येत होते. डेन्मार्कच्या खेळाडूंनी आपले अश्रू डोळ्यांतच साठवून ठेवले होते. त्यांनी एरिक्सनभोवती उभे राहात त्याच्यावर होणारे उपचार कुणालाही कळू दिले नाहीत. एरिक्सनला काय झालेय, हे कुणालाही कळत नव्हते. एरिक्सनची पत्नी सबरिना मैदानावर आल्यानंतर तिला डेन्मार्कचा कर्णधार सिमॉन जाएर व गोलरक्षक कास्पेर श्मेइचेल यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पार्केन स्टेडियमवर स्मशानशांतता पसरली होती. शुद्धीवर आल्यानंतर एरिक्सनला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले, तेव्हा सर्वानी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. ‘‘वैद्यकीय पथकाकडून व अन्य सहकाऱ्यांकडून तात्काळ मदत मिळाली. त्यांच्या सहकार्यामुळेच एरिक्सनचे प्राण वाचवण्यात आम्हाला यश आले,’’ असेही बोएसेन यांनी सांगितले.

एरिक्सनची प्रकृती स्थिर

डेन्मार्कचा मध्यरक्षक ख्रिस्तियन एरिक्सन फिनलंडविरुद्धच्या सामन्यात मैदानावरच कोसळला. एरिक्सनची प्रकृती स्थिर असल्याचे डेन्मार्क फुटबॉल महासंघाकडून सांगण्यात आले. ‘‘एरिक्सेनशी आम्ही सकाळीच बोललो, त्याने सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याची प्रकृती स्थिर असली तरी पुढील तपासण्यांसाठी त्याला रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे,’’ असे महासंघाकडून सांगण्यात आले. मैदानावरच कोसळल्यानंतर जवळपास १५ मिनिटे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर त्याला उचलून रुग्णालयात नेण्यात आले.