रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय पथकाच्या सदिच्छादूतपदी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला आहे. कुस्तीपटू योगेश्वर दत्त तसेच ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग यांनी सलमानच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अव्वल नेमबाजपटू अभिनव बिंद्रासह काही क्रीडापटूंनी सलमानच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. दुसरीकडे भारतीय ऑलिम्पिक समिती सलमानच्या नियुक्तीवर ठाम असून, लवकरच आणखी काही सदिच्छादूतांची नेमणूक करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कुस्तीपटूची भूमिका असलेला सलमानचा सुलतान हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर सलमानची भारतीय ऑलिम्पिक पथकाच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. संगीत आणि क्रिकेट क्षेत्रातील व्यक्तींची सदिच्छादूतपदी नियुक्ती करणार असल्याचे आयओसीने स्पष्ट केले आहे.

‘ऑलिम्पिक चळवळीला पाठिंबा देण्याच्या सलमानच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सदिच्छादूत पद हे मानद असून, यात आर्थिक लाभाचा विषय नाही. सलमानच्या माध्यमातून अधिकाअधिक व्यक्तींपर्यंत ऑलिम्पिक क्रीडाप्रकार आणि क्रीडापटूंना नेणे हे आमचे उद्दिष्ट आहे’, असे भारतीय ऑलिम्पिक समितीचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी सांगितले.

‘ऑलिम्पिक पथकाच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती होण्यात सलमानचे काहीही योगदान नाही. प्रत्येकाला चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा अधिकार आहे. परंतु ऑलिम्पिक हे चित्रपट लोकांपर्यंत पोहचवण्याचे माध्यम नाहीत, अशा शब्दांय योगेश्वर दत्तने आपली नाराजी व्यक्त केली होती. सदिच्छादूताची नक्की भूमिका काय असते असा सवालही योगेश्वरने उपस्थित केला.

‘सलमानचा चाहतावर्ग प्रचंड आहे. त्याला खेळांची माहिती आहे. त्याच्या माध्यमातून असंख्य लोक ऑलिम्पिकशी जोडले जातील. सलमानबाबत लोकांचे मत वेगळे असू शकते. त्यांच्या मताचा मी आदर करतो’, असे हॉकी कर्णधार सरदार सिंगने सांगितले. ‘ऑलिम्पिक पथकाच्या सदिच्छादूतपदी नियुक्ती झाल्याबद्दल सलमानचे अभिनंदन. तुझी प्रतिमा ऑलिम्पिकला उपयुक्त ठरेल,’ असे अभिनव बिंद्राने सांगितले.

खेळाडू केंद्रस्थानी हवेत-विश्वनाथन आनंद

रिओसाठी पात्र ठरलेल्या क्रीडापटूंच्या मागण्या पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे असे मत अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने व्यक्त केले. तो पुढे म्हणाला, ‘ऑलिम्पिक चळवळीशी अधिकाअधिक लोक संलग्न होणे चांगली गोष्ट आहे. परंतु या प्रक्रियेत खेळाचा आत्मा हरवता कामा नये. खेळाडूंच्या मागण्या काय आहेत यावर भर दिल्यास बिगरक्रीडापटू व्यक्तींच्या हितसंबंधांचा प्रश्नच उद्भवणार नाही. दोन्ही गोष्टी मिळून खेळाडूंचे भले होणे महत्त्वाचे आहे. रिओसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचा सराव सुरू झाला आहे. त्यांना शुभेच्छा!’