जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेविषयी कोहलीचे मत

पीटीआय, मुंबई</strong>

यापूर्वीही अनेक दौऱ्यावर आम्ही एकही सराव सामना न खेळता किंवा फारसा सराव न करता थेट मैदानात उतरलो आहोत. त्यामुळे अपुऱ्या सरावामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत आमच्या कामगिरीवर कोणताही प्रभाव होणार नाही, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ बुधवारी इंग्लंडला रवाना झाला. त्यापूर्वी कोहलीने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. १८ जूनपासून साऊदम्पटन येथे अंतिम फेरी रंगणार आहे. न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला प्रारंभ झाला असून भारत मात्र फक्त काही दिवसांच्या सरावासह थेट अंतिम फेरीत खेळणार आहे.

‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आम्हाला पुरेसा सराव मिळणार नाही, हे ठाऊक आहे. परंतु यामुळे मी किंवा संघातील अन्य खेळाडू किंचीतही चिंतेत नाही. किंबहुना यापूर्वीही आम्ही कित्येक दौऱ्यांवर सरावाविना थेट सामना खेळून मालिका जिंकली आहे. त्यामुळे अपुरा सराव आणि दडपण यांसारख्या गोष्टी फक्त तुमच्या मनात घोळत असतात. त्याचा प्रत्यक्षात कामगिरीशी संबंध नसतो,’’ असे कोहली म्हणाला.

‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत मिळवलेल्या कसोटी मालिका विजयानंतर संघाचा आत्मविश्वास बळावला. त्या विजयाद्वारे आम्ही जागतिक अजिंक्यपद मिळवू शकतो, याची खात्री झाली. आता इंग्लंडमध्ये अंतिम सामना होत असल्यामुळे दोन्ही संघांसाठी सारखीच आव्हाने असतील. त्यामुळे आम्ही त्यांना कमी लेखण्याची चूक करणार नाही,’’ असेही कोहलीने सांगितले. याव्यतिरिक्त कोहलीने प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुचवलेल्या एकाच अंतिम सामन्याऐवजी सर्वोत्तम तीन लढतींच्या पर्यायालाही पाठिंबा दर्शवला.