ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चेतेश्वर पुजाराने आपल्या फलंदाजीने कांगारुंना अक्षरशः सळो की पळो करुन सोडलं आहे. सध्या सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातही पुजाराने शतकी खेळी केली. सध्या मालिकेत पुजारा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या पहिल्या क्रमांकावर आहे. एकीकडे कांगारुंविरुद्ध फलंदाजी करत असताना चेतेश्वर पुजारा मनाने भारतात असलेले आपले वडिल अरविंद पुजारा यांच्या आजारपणाशीही झुंज देतो आहे.

पुजारा यांच्या परिवाराचे मुंबईतले डॉक्टर यश लोखंडवाला यांनी अरविंद पुजारा यांना असलेल्या हृदयाच्या आजारासाठी वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयात असतानाही अरविंद पुजारा यांना आपल्या मुलाच्या खेळाबद्दल अधिक उत्सुकता होती. “लोकं माझ्या मुलाच्या खेळाचं कौतुक करतायत. माझ्यासाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे, त्याच्या फलंदाजीबद्दल कोणाच्याही मनात शंका असतील तर त्या आता दूर होतील. मी घरी गेल्यावर त्याच्या खेळाच्या हायलाईट्स बघणार आहे.” अरविंद पुजारा बोलत होते.

६८ वर्षीय अरविंद पुजारा यांनी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलं आहे. चेतेश्वर पुजाला वयाच्या सातव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला लागला, त्यावेळपासून अरविंद पुजारा आपल्या मुलाला प्रशिक्षण देत आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात आणि मेलबर्न कसोटी सामन्यात पुजाराच्या शतकाने भारताच्या विजयाचा पाया रचला. डॉक्टरांनी फोनवरुन चेतेश्वर पुजाराशी संपर्क साधला, आणि अरविंद पुजारा यांच्यावर कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली. मात्र यावेळीही त्याचं खेळावरचं लक्ष विचलीत झालं नव्हतं. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर चेतेश्वरने डॉक्टरांना फोन करुन शस्त्रक्रीयेबद्दल विचारलं, यावेळीही अरविंद पुजारा आणि चेतेश्वरमध्ये त्यांच्या तब्येतीऐवजी खेळाबद्दल चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका आटोपल्यानंतर चेतेश्वर पुजारा भारतात येऊन पहिल्यांदा आपल्या वडिलांना भेटणार आहे.