तब्बल १० संघ २१ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. झटपट क्रिकेटच्या या प्रकारात भारताला अद्याप विजेतेपदापर्यंत झेप घेता आलेली नाही. मात्र यंदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वविजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. त्याउलट यंदा १५ दिवस रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानांचा फायदा उठवण्यासाठी उत्सुक आहे. आतापर्यंत सहा विश्वचषकांपैकी चार वेळा विश्वविजेतेपद पटकावून ऑस्ट्रेलियाने आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे. आता मायभूमीत पाचव्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ सज्ज झाला आहे.

२००९  विजेते : इंग्लंड

पुरुषांच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या दोन वर्षांनंतर महिलांच्या ट्वेन्टी-२० महासंग्रामाला सुरुवात झाली. यजमान इंग्लंडने घरच्या मैदानांचा फायदा उठवत भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान यांचे गटातील आव्हान सहज चिरडत उपांत्य फेरीत मजल मारली. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडला सहजपणे नमवत इंग्लंडने पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. इंग्लंडची यष्टिरक्षक-फलंदाज क्लेयर टेलरने दोन अर्धशतके झळकावत छाप पाडली आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावला. भारताने गटातून दोन सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळवले, पण फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताचे घोडदौड संपुष्टात आली.

२०१०  विजेते : ऑस्ट्रेलिया

दर दोन वर्षांनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणे अपेक्षित असताना पुरुषांची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा लांबणीवर पडली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे वेळापत्रक बिघडल्यामुळे अवघ्या १० महिन्यांनी महिलांवर ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याची वेळ आली. कॅरेबियन बेटांवरील तीन ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडला बाद फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र यजमान वेस्ट इंडिजने उपांत्य फेरीत धडक मारत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. भारताने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली, पण ऑस्ट्रेलियाने भारताचे आव्हान परतवून लावत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीतही ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला मात देत विश्वचषकावर मोहोर उमटवली.

२०१२  विजेते : ऑस्ट्रेलिया

आशिया खंडात पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी ‘अ’ गटातून अपेक्षेप्रमाणे तर वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड या संघांनी ब गटातून उपांत्य फेरी गाठली. भारताला मात्र एकही विजय मिळवता न आल्याने साखळी फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्य आणि अंतिम फेरीत कमी धावा करूनही ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कमाल दाखवल्यामुळे कांगारूंच्या संघाला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावता आला. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजच्या पाच फलंदाजांना बाद करण्याची करामत ऑस्ट्रेलियाची मध्यमगती गोलंदाज ज्युली हंटरने केली. विश्वचषकाच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

२०१४  विजेते : ऑस्ट्रेलिया

२०१४चा विश्वचषक आठऐवजी १० संघांमध्ये खेळवण्यात आला. २०१२च्या विश्वचषकातील अव्वल सहा संघ तसेच पात्रता फेरीतून आलेले पाकिस्तान, श्रीलंका आणि आर्यलड व यजमान बांगलादेश यांच्यात चौथ्या पर्वाचा थरार रंगला. मिताली राजने दोन अर्धशतके झळकावत भारताला झकास सुरुवात करून दिली, पण भारताचे आव्हान सलग दुसऱ्यांदा साखळीतच संपुष्टात आले. दोन वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला सलामीलाच न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले. पण पेटून उठलेल्या ऑस्ट्रेलियाने मग साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा आणि अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने विश्वचषक विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली.

२०१६  विजेते : वेस्ट इंडिज

भारतात पहिल्यांदाच ट्वेन्टी-२० महिला विश्वचषकाचा थरार रंगला. साखळी फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंडने अपराजित राहात आपला ठसा उमटवला होता, त्यामुळे त्यांनाच जेतेपदासाठी दावेदार मानले जात होते. स्टेफनी टेलरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे वेस्ट इंडिजने साखळी फेरीतील एका पराभवाचा अपवाद वगळता या विश्वचषकावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. वेस्ट इंडिजने सलग चौथ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे ऑस्ट्रेलियाचे स्वप्न धुळीस मिळवले. वेस्ट इंडिजच्या रूपाने नवा जगज्जेता मिळाला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताची घरच्या मैदानावर मात्र डाळ शिजू शकली नाही.

 २०१८  विजेते : ऑस्ट्रेलिया

गतविजेत्या वेस्ट इंडिजला दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाचा मान मिळाला. वेस्ट इंडिजने साखळी फेरीत चारही सामने जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले आणि सलग दुसऱ्यांदा आपण विश्वचषक उंचावण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताची तोफ पहिल्यांदाच धडाडली. साखळीत सर्व सामने जिंकून भारताने थाटात उपांत्य फेरी गाठली. पण इंग्लंडच्या झंझावातासमोर भारताचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत पुन्हा एकदा इंग्लंडला नेस्तनाबूत करत चौथ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले.

(संकलन : तुषार वैती)