अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही ग्रँडस्लॅम उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिलेला डॉमिनिक थिम आणि पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा अलेक्झांडर झ्वेरेव्ह या नव्या ताऱ्यांना आता ग्रँडस्लॅम उंचावण्याची संधी रविवारी मिळणार आहे.

करोनामुळे अमेरिकेत प्रवास करण्यास नकार देणारा राफेल नदाल आणि दुखापतीमुळे वर्षभर टेनिसपासून दूर राहणारा रॉजर फेडरर यांच्या अनुपस्थितीत नोव्हाक जोकोव्हिच अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजला जात होता. पण जोकोव्हिचची अनपेक्षित हकालपट्टी झाल्यामुळे सहा वर्षांनंतर अमेरिकन स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रियाच्या थिमने चौथ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असली तरी त्याच्यासमोर यंदा फेडरर, नदाल, जोकोव्हिच या टेनिसमधील मातब्बर त्रिकू टाचे आव्हान नसेल. त्यामुळे कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घालण्याची संधी त्याच्यासमोर असेल. झ्वेरेव्हने यावर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. आता अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून त्याने आपली कामगिरी उंचावली आहे. शुक्रवारी थिमने उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा ६-२, ७-६ (९-७), ७-६ (७-५) असा पाडाव केला होता. दोन सेटने पिछाडीवर पडल्यानंतरही झ्वेरेव्हने स्पेनच्या पाबलो बस्टाला ३-६, २-६, ६-३, ६-४, ६-३ अशी धूळ चारली.

थिमने अंतिम फेरीपर्यंत वाटचाल करताना आतापर्यंत फक्त एक सेट गमावला आहे. झ्वेरेव्हने उपांत्य फेरीत बस्टाविरुद्ध दोन सेट गमावले होते. पण जोमाने पुनरागमन करत त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरी गाठल्याने दोघांचा आत्मविश्वास उंचावला असला तरी चौथ्या प्रयत्नांत ग्रँडस्लॅम जेतेपद उंचावण्याचे दडपण थिमवर असेल.  तीन नामांकित खेळाडूंविना होणाऱ्या अंतिम फेरीने चाहत्यांची काहीशी निराशा केली असली तरी दोघांमध्येही आक्रमक खेळ करण्याची क्षमता आहे.

झोनारेव्हा-सेगमंड यांना महिला दुहेरीचे जेतेपद

रशियाची वेरा झोनारेव्हा तसेच जर्मनीची लॉरा सेगमंड यांनी पहिल्यांदाच एकत्र खेळताना अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची कमाई के ली. झोनारेव्हा-सेगमंड जोडीने चीनची झू यिफान आणि अमेरिके ची निकोला मेलिचर यांचा ६-४, ६-४ असा सहज पराभव करून महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. झोनारेव्हाचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. झू-निकोला जोडीला सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या महिला दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

अलेक्झांडर झ्वेरेव्ह

* जागतिक क्रमवारीतील स्थान : ७

* सर्वोत्तम कामगिरी : ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी (२०२०), फ्रेंच स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी (२०१८, २०१९)

* एटीपी जेतेपदे : ११

९ डॉमिनिक थिम आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह

यांच्यात आतापर्यंत ९ लढती रंगल्या असून थिमने ७ वेळा बाजी मारली असून झ्वेरेव्हला दोनदाच विजय मिळवता आला आहे. थिमने झ्वेरेव्हविरुद्धच्या गेल्या तीन लढती जिंकल्या आहेत.

१ अलेक्झांडर झ्वेरेव्ह याने हार्डकोर्टवर थिमवर एकदाच विजय मिळवला आहे. २०१६मध्ये झ्वेरेव्हने थिमवर सरशी साधली आहे.

डॉमिनिक थिम

* जागतिक क्रमवारीतील स्थान : ३

* सर्वोत्तम कामगिरी : ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी (२०२०), फ्रेंच स्पर्धेची अंतिम फेरी (२०१८, २०१९)

* एटीपी जेतेपदे : १६

पुरुष एकेरी अंतिम सामना

*  वेळ : आज मध्यरात्री १.३० वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, २ आणि एचडी वाहिन्या.