उपांत्य फेरीत झ्वेरेव्हवर मात

मेलबर्न : ऑस्ट्रियाच्या पाचव्या मानांकित डॉमिनिक थीमने संघर्षपूर्ण उपांत्य लढतीत अलेक्झांडर झ्वेरेव्ह याचे आव्हान परतवून लावत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा थीम हा ऑस्ट्रियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. झ्वेरेव्हविरुद्ध थीमचा हा ११ सामन्यांतील सातवा विजय ठरला.

पहिला सेट गमावल्यानंतर आणि तिसऱ्या सेटमध्ये दोन ब्रेकपॉइंट वाचवल्यानंतर थीमने तीन तास, ४२ मिनिटे रंगलेल्या उपांत्य सामन्यात जर्मनीच्या पाचव्या मानांकित झ्वेरेव्हला ३-६, ६-४, ७-६ (३), ७-६ (४) असे पराभूत केले. आता विजेतेपदासाठी रविवारी रॉड लेव्हर एरिनात रंगणाऱ्या सामन्यात थीमसमोर सात वेळच्या विजेत्या नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असेल. जोकोव्हिचला अंतिम फेरीत धूळ चारल्यास ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या १५० जणांच्या यादीत थीम स्थान मिळवेल.

झ्वेरेव्हने पहिल्या सेटमध्ये ४-१ अशी आघाडी घेत या सामन्यात थाटात सुरुवात केली होती. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये थीमने पुनरागमन करत झ्वेरेव्हची सव्‍‌र्हिस भेदली आणि हा सेट जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. पुढील दोन्ही सेटमध्ये थीम आणि झ्वेरेव्ह यांनी कडवा प्रतिकार केला. टायब्रेकपर्यंत रंगलेल्या या दोन्ही सेटमध्ये थीमने झ्वेरेव्हला मात देत आगेकूच केली.

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणे, हेच माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. फ्रेंच स्पर्धेत दोन वेळा राफेल नदालचा आणि आता जोकोव्हिचचा अंतिम फेरीत सामना करत आहे. जोकोव्हिच महान खेळाडू असला तरी जिंकण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. नदालविरुद्ध चार तास आणि आता पावणेचार तास झुंज दिल्यानंतर जोकोव्हिचविरुद्ध मला सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे.

– डॉमिनिक थीम

डॉमिनिक थीमने तीन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याची किमया केली आहे. याआधी त्याने २०१८ आणि २०१९मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने गेल्या १० लढतींमध्ये डॉमिनिक थीमला सहा वेळा पराभूत केले आहे. थीमने चार वेळा जोकोव्हिचवर सरशी साधली आहे.

जोकोव्हिच-थीम यांच्यात झालेल्या गेल्या पाच लढतींमध्ये तब्बल चार वेळा विजयी होण्याचा मान थीमने पटकावला आहे.

सेरेना विल्यम्स, सिमोना हॅलेप, नाओमी ओसाका यांसारख्या अव्वल खेळाडू बाहेर फेकल्या गेल्यामुळे बिगरमानांकित गार्बिन मुगुरुझा आणि फारशी प्रकाशझोतात नसलेली सोफिया केनिन यांच्यात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीची अंतिम लढत शनिवारी रंगणार आहे.

अव्वल १० मानांकित खेळाडूंपैकी सहा टेनिसपटूंचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आल्यामुळे नवख्या खेळाडूंना विजेतेपदाची संधी मिळणार, हे निश्चित होते. अंतिम फेरीपर्यंत मजल मारत केनिन हिने १५व्या स्थानावरून नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जर अंतिम फेरीत मुगुरुझाला हरवण्यात केनिन अपयशी ठरल्यास तब्बल २३ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या सेरेनाला मागे टाकून ती सातव्या स्थानी पोहोचेल. वर्षभरापूर्वी पहिले डब्ल्यूटीए जेतेपद पटकावणाऱ्या केनिन हिने आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि आक्रमक खेळाच्या जोरावर या मोसमात आणखीन दोन जेतेपदांची भर घातली.

रोमानियाच्या २६ वर्षीय मुगुरुझाने फ्रेंच खुली स्पर्धा (२०१६) आणि विम्बल्डन (२०१७) विजेतेपदावर मोहोर उमटवल्यामुळे या सामन्यात तिचेच पारडे जड मानले जात आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धात खेळण्याचा अनुभव गाठीशी असला तरी गेल्या १८ महिन्यांत तिला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. २०१४नंतर पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत बिगरमानांकित खेळाडू म्हणून खेळणाऱ्या मुगुरुझाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना अव्वल १०पैकी तीन जणींना पराभवाची धूळ चारली आहे.

बाबोस-लाडेनोव्हिचला महिला दुहेरीचे विजेतेपद

फ्रान्सची क्रिस्तिना लाडेनोव्हिच आणि हंगेरीची टिमीया बाबोस यांनी अव्वल मानांकित साय सू-वेई आणि बाबरेरा स्ट्रायकोव्हा यांना पराभवाची धूळ चारत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्यांचे हे तिसरे ग्रँडस्लॅम तर एकूण १०वे विजेतेपद ठरले. लाडेनोव्हिच-बाबोस जोडीने विम्बल्डन विजेत्या साय-बाबरेरा जोडीवर ६-२, ६-१ अशी सहज मात केली.