२०१९ विश्वचषकात उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चांना उधाण यायला लागलं. मध्यंतरीच्या काळात धोनी क्रिकेटला रामराम करण्याच्याही तयारीत होता, मात्र विराट आणि रवी शास्त्रींनी केलेल्या विनंतीमुळे त्याने आपल्या निवृत्तीचा निर्णय पुढे ढकलला. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये धोनीच्या निवृत्तीबद्दल अनेक चर्चा सुरु असतानाही धोनीने आपल्या निवृत्तीबद्दल अधिकृतपणे कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. मात्र पहिल्यांदाच धोनीने आपल्या भविष्यातील योजनांबद्दल (Future Plans) वक्तव्य केलं आहे.

मुंबईत एका खासगी कार्यक्रमाच्या निमीत्ताने धोनीने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात पत्रकारांनी धोनीला त्याच्या भविष्याबद्दल काही ठरवलंय का?? असा प्रश्न विचारला. यावर बोलताना, जानेवारीपर्यंत काही विचारु नका ! असं म्हणत धोनीने अधिक काही बोलणं टाळलं. मात्र धोनीने केलेल्या वक्तव्यामुळे, पुन्हा एकदा त्याच्या निवृत्तीविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाहीये.

निवड समितीने आगामी टी-२० विश्वचषक लक्षात घेता, धोनीला आता संघात स्थान मिळणार नाही हे पक्क केलेलं आहे. धोनीऐवजी ऋषभ पंत सध्या मर्यादीत षटकांच्या सामन्यात यष्टीरक्षकाची भूमिका बजावतो आहे. मध्यंतरी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार की नाही हे त्याच्या आगामी आयपीएलमधील कामगिरीवर अवलंबून असेलं असं म्हटलं होतं. त्यामुळे आगामी काळात धोनी आपल्या निवृत्तीबद्दल कधी निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.