कनिष्ठ गटातील जागतिक विजेती निखत झरीन हिच्याशी दोन हात करायला मी घाबरत नाही. ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी निवड चाचणीत तिला पराभूत करणे ही माझ्यासाठी फक्त औपचारिकता आहे, अशा शब्दांत सहा वेळा जगज्जेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोमने झरीनचा समाचार घेतला.

पुढील वर्षी चीनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडताना मेरी कोमला थेट स्थान देण्यात येऊ नये. मेरीविरुद्ध माझी निवड चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी दोन दिवसांपूर्वी झरीनने केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली होती. त्यानंतर या वादाप्रकरणी मेरी कोमने प्रथमच भाष्य केले.

ती म्हणाली, ‘‘भारतीय बॉक्सिंग महासंघाने निर्णय घेतल्याने मी नियमांमध्ये बदल करू शकत नाही. रिंगणात उतरून लढणे हेच माझे काम आहे. बीएफआय जो काही निर्णय घेतील, त्यानुसार मला पुढील कार्यवाही करावी लागते. झरीनशी लढायला मी घाबरत नाही. निवड चाचणीत उतरायला मी तयार आहे.’’

‘‘सॅफ स्पर्धेसह अनेक वेळी मी झरीनला हरवले आहे, तरीही ती माझ्याशी लढण्याची भाषा करत आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक कोण जिंकून देऊ शकते, याची कल्पना बीएफआयला आहे. माझ्यावर याआधीही अशाप्रकारची टीका केली आहे. पण रिंगणात आपल्या कामगिरीद्वारे मी सर्वानाच उत्तर दिले आहे. गेली २० वर्षे मी याविरोधात लढत आहे. मी झरीनविरोधी नाही. तिने भविष्यात चांगली कामगिरी करावी, असे मला वाटते. एखाद्याला आव्हान देणे सोपे असते, पण कामगिरी करणे कठीण असते,’’ अशा शब्दांतही मेरी कोमने झरीनला सुनावले आहे.

बॉक्सिंग हे बिंद्राचे क्षेत्र नाही! : निवड चाचणी घेण्याची मागणी करणाऱ्या निखत झरीनला पाठिंबा दिल्याप्रकरणी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यावरही मेरी कोमने तोफ डागली. ‘‘बिंद्रा हा ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता असला तरी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कित्येक सुवर्णपदके माझ्या नावावर आहेत. हस्तक्षेप करण्यासाठी बॉक्सिंग हे बिंद्राचे क्षेत्र नाही. बिंद्राला बॉक्सिंगमधील नियमांची माहिती तरी आहे का? त्यामुळे त्याने गप्प बसावे,’’ अशा शब्दांत मेरी कोमने नाराजी व्यक्त केली.